belgaum

आदित्यराज कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा पत्रकारांवर हल्ल्याचा प्रयत्न

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : आदित्यराज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध बहुकोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरातील भाग्यनगर येथील कंपनीच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची माहिती आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांकडून अडवण्यात आल्याचा तसेच त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीविरोधातील कारवाई आणि कार्यालयातील परिस्थितीबाबत माहिती संकलित करण्यासाठी विविध माध्यमांचे प्रतिनिधी कार्यालय परिसरात दाखल झाले होते. यावेळी कंपनीच्या काही महिला कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांना प्रश्न विचारण्यास व चित्रीकरण करण्यास विरोध केल्याचे सांगितले जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पत्रकारांशी वाद घातल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, काही कर्मचारी एकत्र येत माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच अपमानास्पद शब्दांचा वापर करून पत्रकारांना तेथून निघून जाण्यास सांगितल्याचाही आरोप करण्यात आला आहे. यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

 belgaum

याचदरम्यान काही पुरुष कर्मचाऱ्यांनीही माध्यम प्रतिनिधींशी शाब्दिक चकमक करत आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे मालक बालराज माने यांच्या समर्थनार्थ काही कर्मचारी उघडपणे भूमिका घेत असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले. पत्रकारांवर दबाव आणण्याचा आणि माहिती बाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप माध्यम प्रतिनिधींनी केला आहे.

दरम्यान, आदित्यराज कॅपिटलविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे आधीच शहरात खळबळ उडाली असून, संबंधित यंत्रणांकडून तपास आणि पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. अशा परिस्थितीत माध्यम प्रतिनिधींशी झालेल्या कथित गैरवर्तनामुळे पत्रकार संघटनांमध्येही संताप व्यक्त केला जात आहे.

पत्रकारांना माहिती संकलन आणि वृत्तांकन करण्याचा घटनादत्त अधिकार असून, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची अरेरावी किंवा धक्काबुक्की होणे ही गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे. या घटनेबाबत संबंधित प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पत्रकारांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्रकारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आदित्यराज कॅपिटलच्या चार महिला कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया हाती घेतली आहे. पत्रकार संघटनांनीही या प्रकाराचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.