बेळगाव लाईव्ह : राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या बेळगाव जिल्हा आणि तालुका शाखांच्या निवडणुकीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ‘गुरुस्पंदन शिक्षक संघा’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मनमानी कारभाराचा निषेध म्हणून शिक्षकांनी हाताला काळ्या फिती बांधून बेळगावच्या डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांना निवेदन दिले.
या संघटनेची मुदत डिसेंबर २०२५ मध्येच संपली असून २०२६-३१ या कालावधीसाठी नवीन निवडणूक होणे गरजेचे होते.
मात्र बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, बैलहोंगल, खानापूर आणि कित्तूर या पाच तालुक्यांमध्ये कोणतीही अधिकृत निवडणूक प्रक्रिया राबवली गेली नाही, मतदार याद्या प्रसिद्ध केल्या नाहीत की कोणाला उमेदवारी अर्ज भरण्याची संधी दिली गेली नाही, अशी तक्रार शिक्षकांनी केली आहे.
असे असतानाही काही शिक्षकांनी स्वतःला पदाधिकारी घोषित करून सोशल मीडियावर संदेश पसरवल्याने सामान्य शिक्षकांमध्ये तीव्र संताप आहे. ही अनधिकृत निवड रद्द करून तातडीने लोकशाही मार्गाने पारदर्शक निवडणूक घ्यावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
शिक्षकांचे निवेदन स्वीकारल्यानंतर, डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हा विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन लवकरच योग्य ती कायदेशीर पावले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.




