belgaum

या ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा; यावर तातडीने उपाययोजनांची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर गावातील विविध प्रलंबित नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना निवेदन सादर केले. ई-सत्तु (संगणक उतारे) वितरणातील विलंब, पाणीटंचाई, स्मशानभूमीतील अपुऱ्या सुविधा आणि गटार सफाईच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरापासून अनेक नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे ई-सत्तु उताऱ्यांसाठी अर्ज केले आहेत. मात्र अद्याप एकाही अर्जदाराला उतारा मिळालेला नाही. कर्ज प्रकरणे, मालमत्ता हस्तांतरण तसेच विविध शासकीय कामांसाठी हा उतारा आवश्यक असतानाही ग्रामपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

याशिवाय गावातील सरकारी स्मशानभूमीत वीज, पाणी आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाडेझुडपे वाढल्यामुळे अंत्यविधीसाठी ये-जा करणे कठीण झाले असून, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतलेली नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

 belgaum

गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून काही भागांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत जोडणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची तक्रार करण्यात आली. तसेच पावसाळा तोंडावर आला असतानाही गावातील गटारींची साफसफाई करण्यात आलेली नसल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

काही ठिकाणी केवळ दिखाऊ स्वरूपाची कामे करून संपूर्ण गावातील मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. घरपट्टी आणि पाणीपट्टी वेळेत न भरल्यास दंड आकारला जातो, मात्र नागरिकांना आवश्यक सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

गावातील ई-सत्तु उतारे, पाणीपुरवठा, स्मशानभूमी सुविधा, गटार सफाई आणि इतर नागरी समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा ग्रामस्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करतील तसेच घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यावर बहिष्कार टाकतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

याबाबत माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. यावेळी शिवाजी नांदूरकर, परशराम परीट, निखिल पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.