बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील एका सराईत आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे १७ लाख ९० हजार रुपये मूल्याचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून यामुळे परिसरातील तीन मोठ्या चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
भवानी नगर येथील रहिवासी रोहन राजेश जाधव यांनी आपल्या घरात झालेल्या चांदीच्या दागिन्यांच्या चोरीबाबत बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडा यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय संतोष दळवाई, पीएसआय लक्कप्पा जोडट्टी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे निलेश भरमा सुतार (वय ४१, रा. संभाजी गल्ली, मंडोळी, मूळ रा. भोई गल्ली, बेळगाव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
पोलीस चौकशीदरम्यान आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने भवाणीनगर येथील रोहन जाधव यांच्या घरात, मच्चे गावातील गंगा गल्ली येथील लक्ष्मी रुद्रप्पा देवलापूर यांच्या घरात आणि मच्चे गावातील गणेश ज्वेलर्स या सराफा दुकानात चोऱ्या केल्याची कबुली दिली. आरोपीकडून ७ लाख रुपये किमतीचे ९५ ग्रॅम सोने आणि १० लाख ९० हजार रुपये किमतीची १४ किलो १७८ ग्रॅम चांदी असा एकूण १७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमणीगौडा, पीएसआय संतोष दळवाई, लक्कप्पा जोडट्टी आणि कर्मचारी सतीश नायकवाड, श्रीकांत उप्पार, बाळेश पडनाड, आनंद कोटगी, शिवानंद वर्चगल्ल, अमित रूपनवर, शिवकुमार कांबळे तसेच तांत्रिक विभागाचे रमेश अक्की, महादेव काशिद, दीपक दोडगोणी यांचे पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.




