बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील दक्षिण मतदार संघात विद्यमान आमदारांकडून मनमानी सुरु आहे. जनतेवर अन्याय सुरु आहे.
यावर मात करून जनतेला न्याय देण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवून राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा बेळगाव बार अससिएशनचे अध्यक्ष वकील प्रभू यत्नट्टी यांनी बोलून दाखविली.
आज बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तेबोलत होते. बेळगाव दक्षिण विभागासाठी स्वतंत्र सब रजिस्ट्रार कार्यालय सुरु करण्याचा विचार सुरु असून याला आपला विरोध नाही. मात्र दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील जनतेला कोणत्याही सब रजिस्ट्रार कार्यालयात मालमत्ता खरेदी विक्री नोंद करण्याची मुभा द्यावी, अशी आपण मागणी केली होती. यासंदर्भात महसूल मंत्र्यांना पत्रही लिहिले होते. मात्र याबाबत आमदारांनी आडकाठी केल्याचा आरोप यत्नट्टी यांनी केला.
दक्षिण आमदारांमुळे पोलिसांनी एका व्यावसायिकाला खोट्या खून प्रकरणात अडकविले, वकिलांवर दलित अत्याचाराचे खोटे गुन्हे दाखल केले. दक्षिण आमदारांचा हा मनमानी कारभार सुरु असून पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून निष्पाप लोकांवर दबाव आणण्यात येत असल्याचेही यत्नट्टी यांनी सांगितले.
दक्षिण मतदार संघातील जनता, बिल्डर्स आणि व्यापारी सध्या भीतीच्या छायेखाली जगत असून अनेक अधिकारीदेखील आमदारांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप यत्नट्टी यांनी केला.