येळ्ळूर राजहंस गड येथे येत्या रविवार दि. 19 मार्च रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीच्या महादुग्धाभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असून या सोहळ्याच्या नियोजन समितीचे सदस्य व समिती पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी गडाला भेट देऊन पाहणी केली.
राजहंस गडावरील शिवछत्रपतींच्या दुग्धाभिषेक सोहळ्याला शिवप्रेमीसह समस्त मराठा व मराठी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समिती नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी गडाला भेट दिली. गडावर दाखल होताच सर्वांनी सर्वप्रथम शिवरायांच्या मूर्तीला नमन करून त्यांचा जय जयकार केला.
या भेटीदरम्यान महाराजांच्या मूर्तीसमोरील विस्तृत जागेत सोहळ्याचे कशा पद्धतीने आयोजन करायचे याबाबत चर्चा करून पाहणी करण्यात आली. अभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांसह महाप्रसाद वाटपाची व्यवस्था कशी केली जावी? तसेच वाहतूक आणि पार्किंगची सोय वगैरे बाबींवर याप्रसंगी चर्चा करण्यात आली. सोहळ्यादिवशी येळ्ळूरसह आसपासच्या गावातील गावकऱ्यांच्या मदतीने येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गडाच्या पायथ्याशी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
राजहंस गडाला भेट देणाऱ्या समितीच्या शिष्टमंडळातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, साहित्यिक गुणवंत पाटील, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण -पाटील, येळळूर समितीचे दुधाप्पा बागेवाडी,वामन पाटील, प्रकाश अष्टेकर,राजू पावले,दत्ता उघाडे महेश जुवेकर आदींनी मूर्ती परिसर आणि गडाची पाहणी केली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने येत्या रविवारी राजहंस गडावर होणारा छत्रपतींचा दुग्धाभिषेक सोहळा हा निश्चितपणे भव्यदिव्य होईल या दृष्टीने आवश्यक सर्व जय्यत तयारी केली जाणार आहे.
त्या अनुषंगाने श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटी राजहंसगड आणि येळ्ळूर विभाग समितीच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेण्यात आली. आता येत्या रविवार पर्यंत दररोज सायंकाळी पाच वाजता रंगुबाई पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव या ठिकाणी नियोजनाची बैठक होत राहणार आहे. तरी समितीच्या सक्रिय कार्यकर्त्यांनी याची नोंद घेऊन या बैठकीसाठी वेळ द्यावा असे आवाहन राजहंस गडावरील पाहणी दौरा आणि चर्चेअंती करण्यात आले आहे.
पाहणी दौऱ्यानंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना माजी आमदार मनोहर किणेकर यांनी आजच्या पाहणी दौऱ्याचा उद्देश स्पष्ट केला. वाहनांचे पार्किंग, महाप्रसाद तयारीची व्यवस्था, त्याचबरोबर महादुग्धाभिषेकाचे नियोजन कशाप्रकारे करायचे? मूर्तीची स्वच्छता वगैरे करायची का? त्याचप्रमाणे श्री सिद्धेश्वर मंदिरातील अभिषेक, या सर्व बाबींसाठी आजचा हा पाहणी दौरा होता. या दौऱ्याप्रसंगी कार्यकर्त्यांच्या सूचनानुसार पुढील कारवाई करण्यासाठी येत्या एक-दोन दिवसात बैठक घेऊन कार्यकर्त्यांनी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
याबरोबरच मराठा समाज आणि मराठी भाषिक संघटित व्हावेत हा या महादुग्धाभिषेक सोहळा आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. जे आमचे आराध्य दैवत आहे, त्यांच्या पायथ्याशी आपण सर्वांनी मराठा आणि मराठी समाजाच्या हितासाठी शपथबद्ध व्हावयाचे आहे. प्रत्येक मराठी माणसाने आपले कर्तव्य म्हणून ही शपथ घेणे गरजेचे आहे. गेली 15 वर्षे बेळगावसह सीमाभागातील मराठी जनतेने जो वनवास भोगला तो वनवास दूर करण्यासाठी आणि त्यासाठी सर्वांना एकत्रित करण्यासाठी आपण सर्वजण शिवछत्रपतींच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून त्यांच्या आशीर्वादाने पुढची वाटचाल करणार आहोत असे सांगून रविवारचा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक समिती कार्यकर्त्याने झटावे, असे आवाहन माजी आमदार मनोहर किणेकर यांनी शेवटी केले.