बेळगाव लाईव्ह : सालाबादप्रमाणे बसवण कुडची येथे श्री बसवेश्वर, श्री कलमेश्वर आणि श्री ब्रह्मलिंग यात्रोत्सवानिमित्त इंगळयांचा कार्यक्रम पार पडला. हर हर महादेवच्या जयघोषात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १४) येथील यात्रा पार पडली.
मंगळवारी सकाळी भाविक भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक विधींना प्रारंभ झाला. सायंकाळी ६ च्या सुमारास धार्मिक विधी पार पडल्यानंतर मानकरी आणि पुजाऱ्यांच्या हस्ते इंगळयांचे पूजन पार पडले. यावेळी भक्त, मानकरी आणि मानाच्या पालख्या सहभागी झाल्या होत्या.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत अत्यंत उत्साहात हि यात्रा पार पडली. डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा इंगळयांचा कार्यक्रम पाहण्यासाठी बसवण कुडचीसह बेळगाव परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याने मंदिर परिसर गर्दीने फुलून आला होता.
विविध स्टॉल्ससह खेळण्यांच्या दुकानात भाविकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. याचप्रमाणे मनोरंजनात्मक खेळदेखील दाखल झाल्याने बालचमूंनी याचाही आनंद घेतला.