बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील गुंजेनट्टी येथील होळी कामाण्णा मंदिर प्रसिद्ध असून या ठिकाणी रंगपंचमी दिवशी यात्रा भरविण्यात येते. पूर्वी केवळ एकच दिवस भरणारी यात्रा अलीकडे दोन ते तीन दिवस साजरी करण्यात येत आहे.मंगळवार दि 7 मार्चपासून सुरू होत असलेल्या श्री होळी कामाण्णा देवालयाच्या यात्रो उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून पूर्ण गुंजेनट्टी गावात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
बेळगावसह संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्र व गोवा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुंजेनहट्टी येथे गेल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना निर्बंधानंतर आता निर्बंध मुक्त यात्रा साजरी होत आहे. यात्रेतील वाढती गर्दी लक्षात घेऊन वाहनांची पार्किंग व्यवस्था कडोली आणि देवगिरी येथे करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.
सालाबाद प्रमाणे धुलीवंदना निमित्त गुंजेनहट्टी येथील जागृत देवस्थान श्री होळी कामाण्णा देवाची यात्रा यावर्षीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. बेळगावसह महाराष्ट्र कर्नाटक गोवा येथून लाखो भाविक येऊन आपले नवस फेडतात. कोरोनानंतर यावर्षी निर्बंध मुक्त यात्रा साजरी होणार असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा अंदाज देवस्थान यात्रा कमिटीने व्यक्त केला आहे. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. होळी कामाण्णा मंदिरासमोर भव्य मंडप उभारण्यात आला असून विद्युत रोषणाईने मंदिर सजविण्यात आले आहे.
यात्रा दिवसा पार पाडावी या उद्देशाने देवस्थान पंचकमिटीने सकाळी लवकर श्री होळी कामण्णा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे निश्चित केले आहे. उद्या सकाळी ९.०० वाजता यात्रेला सुरुवात होणार आहे. यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व भाविकांनी सहकार्य करावे, असे आव्हान देवस्थान पंच कमिटीने केले आहे.
शिवाय ज्या ठिकाणी भाविक राहतात त्या ठिकाणीच नैवेद्य दाखवून पूजा करावी. नैवेद्य मंदिराकडे आणू नये, असे आवाहन देवस्थान व पंचकमिटीने केले आहे.