Friday, April 19, 2024

/

शहराच्या अनियमित पाणीपुरवठ्याबाबत आक्रमक पवित्रा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मनपा सभागृहात महापालिकेच्या अर्थसंकल्प पूर्व बैठकीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सर्व नगरसेवक आणि आमदारांनी शहरात कोलमडलेल्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत शहरातील पाणीपुरवठा समस्या निर्माण होण्यासाठी कॅन्टोन्मेंट आणि एल अँड टी कंपनी जबाबदार असल्याचा आरोप शहराच्या आमदारांनी केला.

कॅंटोन्मेंट बोर्डाकडे असलेल्या थकीत बिलाचा मुद्दा आजच्या मनपा बैठकीत उपस्थित केल्यानंतर कॅंटोन्मेंट सीईओंसंदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे महापालिकेचे चार कोटी रुपयांचे बिल थकीत आहे तरीही जलवाहिनी घालण्यासाठी कॅन्टोन्मेंट आठ महिन्यांपासून चालढकल करत आहे. कॅन्टोन्मेंट सीईओ बेळगावकरांचा अपमान करत असून जलवाहिनीचे काम उद्याच्या उद्या हाती घ्यावे, कामात अडथळा आला तर कॅन्टोन्मेंटचा पाणीपुरवठा बंद करण्यात यावा, असा निर्णय महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आला.

शहरात सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी कॅन्टोन्मेंट हद्दीतून चार किलोमीटर जलवाहिनी घालणे आवश्यक आहे. यासाठी गेल्या आठ महिन्यापासून प्रयत्न सुरू आहेत. पण कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करत आले आहे. त्यामुळे बेळगावच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.महापालिकेचे चार कोटी रुपये थकीत असून सुद्धा जलवाहिनी घालण्यासाठी दरवर्षी साठ लाख रुपयांचे भाडे आकारणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पहिल्यांदा थकीत बिल वसूल करण्यात यावे. उद्याच्या उद्या जलवाहिनीचे काम सुरू करण्यात यावे. कॅन्टोन्मेटने हे काम अडवल्यास तत्काळ पाणीपुरवठा बंद करण्यात यावा. त्यांच्या कचऱ्यावर महापालिकेच्या प्रकल्पात प्रक्रिया करण्यात येऊ नये, अशा सूचना आमदारांनी दिल्या. तसेच कॅंटोन्मेंट सीईओंसंदर्भात वादग्रस्त विधान करत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला.

 belgaum

आमदारानी हा मुद्दा उपस्थित करत, जलवाहिनी कामासाठी आतापर्यंत पाच बैठका झाल्या. पण कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रतिसाद देत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. बैठकीत करण्यात आलेल्या चर्चेनंतर महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांनी जलवाहिनीचे काम उद्या सुरू करण्यात येईल,अडथळा आल्यास पाणीपुरवठा बंद करू अशी माहिती दिली.City corporation meeting

यावेळी म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यासह भटक्या कुत्र्यांच्या होत असलेल्या उपद्रवासंदर्भात मुद्दा उपस्थित केला. या समस्या सध्या शहरवासीयांना सतावत असल्याचे ते म्हणाले. ज्यावेळी खोदाई सुरू असते, त्यावेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे जलवाहिनी फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे त्या कुत्र्यांवर बंदोबस्त करण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी. नगरसेवकांना बैठकीची माहिती व्हाट्सअप किंवा तोंडी न सांगता किमान आठ दिवस आधी लेखी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या मागणीला नगरसेवक शंकर पाटील यांनी केली.

याचप्रमाणे या बैठकीत सांडपाणी, गटार, रस्ते आणि स्वच्छता या कामासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात यावी अशीही मागणी नगरसेवकांनी केली. नगरसेवक अजीम पटवेगार, शाहिद पठाण, मुझमील डोनी आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. तर तीन नगरसेवकांचा शपथविधी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.