बेळगाव लाईव्ह : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर २४ आंतरराज्य सीमा तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. गोवा सीमेवर ४ चेक पोस्ट आणि महाराष्ट्र सीमेवर २० चेक पोस्ट आधीच कार्यरत आहेत. या चेकपोस्टवरील पाहणीदरम्यान अवैध मद्यसाठ्यासह एकूण १.४९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी निवडणूक तयारीबाबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये त्यांनी ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स, भित्तिचित्रे हटविण्यात यावीत, नोटीस दिल्यानंतरही भीतिनेपत्रके चिटकविण्यात आल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त्यांना देण्यात आले.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर निवडणूक प्रचारा संदर्भात प्रत्येक गोष्टीची परवानगी संबंधित मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांनी एक खिडकी सुविधा पुरवावी, याबाबत संबंधित विभागाशी समन्वय साधून एकच तपासणी यंत्रणा तयार करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केले.
या बैठकीला शहर पोलीस आयुक्त डॉ.एम.बी.बोरलिंगय्या, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील आदी उपस्थित होते.