Friday, March 29, 2024

/

राजहंसगडावरील ताकद भविष्यातही अबाधित ठेवा : समिती बैठकीत नेते, कार्यकर्त्यांचा सूर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांना शह देण्यासाठी आणि मराठी माणसाची ताकद दाखवून देण्यासाठी येळ्ळूर राजहंसगडावर आयोजित केलेल्या दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण सोहळ्याला मराठी भाषिकांसह समिती नेत्यांनी दाखविलेली एकजूट भविष्यातही अबाधित राहावी, असा सूर आज आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत उमटला. राजहंसगड सोहळ्यासंदर्भात कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि तमाम मराठी भाषिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी व्यासपीठावर माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, ऍड. राजाभाऊ पाटील, ऍड. एम. जी. पाटील यांच्यासह इतर समिती नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत ऍड. अमर येळ्ळूरकर बोलताना म्हणाले, कर्नाटक सरकारचे मराठी माणसावरील अन्याय वाढत चालले असून कर्नाटक सरकार कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्यासाठी कन्नड भाषा सक्तीचा नवा नियम येत्या २३ मार्च पासून लागू करण्याच्या विचारात आहे. मराठी भाषिकांना डिवचून कन्नड भाषिकांचे रक्षण कसे करण्यात येत आहे हे दाखविण्यासाठी भाजप सरकारने हा कुटील डाव रचला आहे. अधिकृतरित्या सर्वत्र कन्नड भाषेचा वापर, कन्नड भाषिकांना नोकरीमध्ये आरक्षण, खाजगी क्षेत्रातील कारखाने, उद्योग, व्यावसायिक आणि प्रामुख्याने मराठी भाषिकांच्या पतसंस्था यावर डोळा ठेवून कन्नड मध्ये व्यवहार सक्ती, फलकांवर ८० टक्के कन्नड भाषेत मजकूर, आणि नियमांचे उल्लंघन केल्यास ५ ते २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई अशा ठळक मुद्द्यांची तरतूद नव्या कायद्यात करण्यात येणार आहे. यामुळे कायद्यानुसार पाहता हा नियम असंवैधानिक आहे. मराठी भाषा संपविण्यासाठी जाणीवपूर्वक भाजप सरकारने हा घाट घातला असल्याची महत्वपूर्ण माहिती ऍड. अमर येळ्ळूरकर यांनी बैठकीत दिली.

 belgaum

यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर बोलताना म्हणाले, राजहंसगडावरील कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला आहे. यामागे हजारो कार्यकर्ते, मराठी भाषिकांचा मोठा वाटा आहे. यावेळी या सोहळ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच भविष्यात शेतकऱ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी नेते राजू शेट्टी यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती मनोहर किणेकर यांनी दिली.Mes meeting

यानंतर विविध समिती नेते आणि कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. राजहंसगडावरील कार्यक्रमात मराठी भाषिक, येळ्ळूर विभाग समिती यांच्यासह ज्यांना ज्यांना या सोहळ्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती, त्यांनी हि जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन समर्थपणे पेलली आणि पार पाडली.

योग्य नियोजन, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि जमलेली न भूतो न भविष्यती अशी मराठी भाषिकांची गर्दी यामुळे राष्ट्रीय पक्षांना नक्कीच धास्ती बसली आहे. मराठी भाषिकांची हीच अभेद्य एकी पुढील काळातही अबाधित ठेवावी, अशी मागणी महादेव पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केली. यावेळी रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.

या बैठकीतील समिती नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.