बेळगाव लाईव्ह : लोंढा रेल्वे स्थानकाच्या यार्डमध्ये अभियांत्रिकी कामांचे नियोजन करण्यात आल्यामुळे २२ ते २८ जुलै दरम्यान रेल्वे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.
या काळात चार रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून दोन गाड्या विलंबाने धावणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.
२४ ते २७ जुलै दरम्यान मिरज-लोंढा डेली पॅसेंजर (गाडी क्र. ५६९३१) बेळगाव आणि लोंढा दरम्यान अंशतः रद्द राहील, म्हणजेच ही गाडी लोंढा ऐवजी बेळगाव स्थानकावरच आपली फेरी पूर्ण करेल.
तर २५ ते २८ जुलै दरम्यान लोंढा-मिरज डेली पॅसेंजर (गाडी क्र. ५६९३२) लोंढा ते बेळगाव दरम्यान रद्द राहून बेळगाववरूनच मिरजसाठी मार्गस्थ होईल. याशिवाय मिरज-कॅसलरॉक डेली एक्सप्रेस (गाडी क्र. १७३३३) आणि कॅसलरॉक-मिरज डेली एक्सप्रेस (गाडी क्र. १७३३४) या गाड्या २५ ते २७ जुलै दरम्यान कॅसलरॉकऐवजी बेळगाव स्थानकावरूनच सुटतील आणि तिथेच थांबतील.
फेऱ्यांमधील या बदलांसोबतच काही गाड्या विलंबाने धावणार आहेत. २२ जुलै रोजी सुटणारी लोकमान्य टिळक टर्मिनस-एसएमव्हीटी बेंगळुरू एक्सप्रेस (गाडी क्र. १६५५४) मार्गात ४० मिनिटे उशिराने धावेल.
तसेच २६ आणि २७ जुलै रोजी बेंगळुरूवरून सुटणारी केएसआर बेंगळुरू-बेळगाव डेली एक्सप्रेस (गाडी क्र. २०६५३) अनुक्रमे ३० मिनिटे आणि ६० मिनिटे विलंबाने धावणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊनच आपला प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.





