बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय रयत-कृषी कर्मचारी संघटनेच्या बेळगाव जिल्हा घटकाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
संघटना राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण जडगन्नवर आणि जिल्हा संयोजक लक्ष्मण बिज्जनवर यांनी सांगितले की, पाऊस नसल्याने पेरलेली पिके करपून गेली असून शेतकरी व शेतमजूर रोजगारासाठी परराज्यात स्थलांतर करत आहेत. शासनाने तातडीने जिल्ह्यात उच्चस्तरीय समिती पाठवून वैज्ञानिक पद्धतीने सर्वेक्षण करावे आणि बेळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी त्यांनी केली.

या निवेदनाद्वारे संघटनेने प्रामुख्याने बेळगाव जिल्हा तातडीने ‘तीव्र दुष्काळग्रस्त’ घोषित करण्याची मागणी केली आहे. तसेच पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना प्रति एकरी ५० हजार रुपये भरपाई मिळावी, सर्व प्रकारची राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांची शेती कर्जे पूर्णपणे माफ करण्यात यावीत,
शेतमजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी मनरेगा अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला २०० दिवस काम व ६०० रुपये रोज मजुरी द्यावी आणि जिल्ह्यातील तलावांचे अतिक्रमण हटवून कृष्णा, घटप्रभा व मलप्रभा नद्यांमधून कालव्यांद्वारे तलाव भरण्यात यावेत, अशा प्रमुख मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.





