बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या वापराबाबत बेळगाव जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. PoP गणेशमूर्तींबाबत जारी करण्यात आलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत दिला.
PoPच्या गणेशमूर्तींचा वापर हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नसून सार्वजनिक आरोग्याशीही संबंधित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. PoPच्या मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर जलस्रोत प्रदूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाने घातलेले निर्बंध हे जनतेच्या हितासाठीच असल्याचे त्यांनी सांगितले.
“आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी झालीच पाहिजे. त्याबाबत दुसरा प्रश्नच नाही. प्रत्येकाने कायद्याचे पालन केले पाहिजे,” असे मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.
गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्तींच्या वापरासाठी जनजागृती करत असल्याचेही त्यांनी सांगितले. मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून त्याबाबतची माहिती सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र, घरगुती गणेशोत्सवात अनेकजण मातीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करत असताना सार्वजनिक गणेश मंडपांमध्ये २० ते ३० जण एकत्र येऊन पुन्हा PoPच्या मूर्ती बसवत असल्याचे चित्र दिसत आहे. हे थांबले पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
प्रशासनाला जनतेच्या धार्मिक भावना दुखावण्याची इच्छा नाही. मात्र, जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नावर प्रशासन कोणतीही तडजोड करणार नाही, असे मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले. गेल्या अडीच वर्षांपासून याबाबत सातत्याने आवाहन केले जात असून, यंदा या नियमांची अधिक कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी पोलीस आयुक्तांसोबत समन्वय साधून PoP गणेशमूर्तींच्या वापराविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
“आम्हाला कारवाई करण्याची वेळ येण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःहून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे नेहमीच चांगले आहे,” असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.





