belgaum

बियाणे, काजू-अंजीरांनी साकारली सात फुटी गणेशमूर्ती

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : शहरात ३८० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना माळी गल्ली गणेशोत्सव मंडळाने यंदाही पर्यावरणपूरक आणि आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. गेल्या चार वर्षांपासून विधायक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाने यंदा शाडूची माती, तलावातील गाळ, शेतातील चिकणमाती, नारळाचा काथा, गवत आणि कागदाचा लगदा यांचा वापर करून तब्बल सात फुटी गणेशमूर्ती साकारली आहे.

या गणेशमूर्तीचे सर्वाधिक लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे तिची सजावट. मूर्तीवर विविध बियाणे आणि नैसर्गिक पदार्थांचा कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. गणेशमूर्तीच्या अंगावर तब्बल सात किलो कलिंगडाच्या बिया, तर धोतरासाठी सूर्यफुलाच्या बियांचा वापर करण्यात आला आहे. तसेच दागिने साकारण्यासाठी काजू, अंजीर आणि अन्य नैसर्गिक पदार्थ वापरण्यात आले आहेत.

या अनोख्या सजावटीसाठी मंडळाचे कार्यकर्ते कुंदनवर्क साकारणारे निखिल यांच्यासह चार जणांनी सलग चार दिवस मेहनत घेतली. नैसर्गिक घटकांचा कलात्मक वापर करून साकारलेली ही मूर्ती यंदा भक्तांचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

 belgaum

ही कलात्मक शाडूची गणेशमूर्ती खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी येथील ज्येष्ठ मूर्तिकार यल्लाप्पा पालकर यांनी साकारली आहे. बेळगाव किल्ला परिसरात सुमारे दहा दिवस परिश्रम घेऊन त्यांनी मूर्ती तयार केली. पारंपरिक मूर्तिकलेला आधुनिक कल्पकतेची जोड देतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे.

मूर्ती विसर्जनानंतर सजावटीसाठी वापरलेले नैसर्गिक घटक पर्यावरणाला हानी पोहोचविणार नाहीत. त्यामुळे माळी गल्ली गणेशोत्सव मंडळाचा हा उपक्रम पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आदर्श ठरणारा आहे.

यल्लाप्पा पालकर, मूर्तिकार :
“मी वयाच्या दहाव्या वर्षापासून शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे काम करतो. आतापर्यंत अनेक मंडळांच्या सार्वजनिक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. मात्र यंदा माळी गल्ली मंडळासाठी आगळीवेगळी गणेशमूर्ती साकारताना वेगळा अनुभव आला.”

मेघन लंगरकांडे, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माळी गल्ली :
“गेल्या चार वर्षांपासून आम्ही शहरात विधायक गणेशोत्सव साकारण्याचा प्रयत्न करत आहोत. यंदाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून सात फुटी गणेशमूर्ती साकारली असून, तिच्या सजावटीसाठी ड्रायफ्रूट आणि विविध बियाण्यांचा वापर केला आहे.”

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.