बेळगाव लाईव्ह : मंत्री सतीश जारकीहोळी आणि त्यांच्या विभागातील नेत्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार आसिफ सेठ यांनी केला आहे. विरोधकांची ‘वॉशिंग मशीन थिअरी’ मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावर कोणताही परिणाम करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आमदार आसिफ सेठ यांनी सतीश जारकीहोळी यांच्यावरील आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले. सतीश जारकीहोळी हे केवळ एका समाजाचे नेते नसून संपूर्ण राज्यातील प्रभावशाली नेते तसेच मोठे उद्योगपती आहेत, असे त्यांनी सांगितले.
निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचे राजकीय हल्ले आणि दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतात. मात्र, अशा सर्व परिस्थितीचा समर्थपणे सामना करण्याची क्षमता सतीश जारकीहोळी यांच्यामध्ये आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजपवर निशाणा साधताना आसिफ सेठ म्हणाले की, विरोधकांकडून ‘वॉशिंग मशीन’च्या राजकारणाचा वापर करून सतीश जारकीहोळी आणि इतर काँग्रेस नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हजारो कोटी रुपयांचा व्यवहार करणाऱ्या उद्योगसमूहांकडे सर्व कायदेशीर कागदपत्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा राजकीय डावपेचांमुळे काँग्रेस नेत्यांना कोणतीही हानी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसमधील एकजुटीबाबत बोलताना आसिफ सेठ यांनी पक्षात कोणतेही अंतर्गत मतभेद नसल्याचा दावा केला. काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
सिटी रवी यांच्यासह विरोधी पक्षातील नेते सरकार अस्थिर होण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. मात्र, सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकार पूर्णपणे सुरक्षित आणि स्थिर असल्याचा दावा आमदार आसिफ सेठ यांनी केला.





