बेळगाव लाईव्ह : समाज बिघडत चालला असताना त्याला योग्य दिशा दाखवणाऱ्या माणसांचे कार्य समाजासमोर येणे गरजेचे आहे. जल, जमीन आणि जंगलासाठी आयुष्यभर कार्य करणारे सर्वोदय कार्यकर्ते डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांच्या कार्याचा गौरव करणारे ‘सर्वोदयाचा वाटसरू’ हे पुस्तक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले.
डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित ‘सर्वोदयाचा वाटसरू’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (४ ऑक्टोबर) गोखले रंगमंदिर येथे उत्साहात पार पडला. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुस्तकाचे मराठी आणि कन्नड भाषेतील प्रकाशन करण्यात आले.
मेधा पाटकर म्हणाल्या की, आज समाजात चंगळवाद, सत्ताकेंद्री व्यवस्था आणि भांडवलशाहीच्या एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला शोषितांचे वास्तव दिसत आहे. जमिनी उद्ध्वस्त होत आहेत, शेतकरी अडचणीत आहे आणि सामान्य माणसाचे जगणेही कठीण होत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण जीवन, शेती आणि सामान्य माणसाच्या जगण्यासाठी कार्य करणाऱ्या कागणीकर यांचे काम ठळकपणे पुढे येते.
जंगलतोडीमुळे नद्या आणि जलस्रोतांवर होणाऱ्या परिणामाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. जगभरात धरणांबाबतचा दृष्टिकोन बदलत असून नैसर्गिक जलस्रोत आणि तलावांच्या संवर्धनावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या परिसरातील जलस्रोतांचा अभ्यास करून त्यांचे जतन करण्यासाठी निश्चित धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे पाटकर यांनी नमूद केले.
‘साने गुरुजी, विनोबा भावेंच्या विचारांनी प्रेरणा’
यावेळी शिवाजीदादा कागणीकर यांनी आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष आणि सामाजिक कार्याची प्रेरणा याबाबत मनोगत व्यक्त केले.
“मी अत्यंत सामान्य कुटुंबातून आलो. शिक्षण माझ्या घरात नव्हते. पाटी नव्हती, वही नव्हती, पेन्सिलही नव्हती. मात्र साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित होऊन मी या कार्याच्या पाठीमागे आलो,” असे त्यांनी सांगितले.
माणसाचे जगणे महत्त्वाचे असून त्याच्या जगण्याला मदत करणे हेच आपल्या कार्याचे केंद्र राहिले, असे कागणीकर यांनी स्पष्ट केले. विनोबा भावे आणि साने गुरुजी यांच्या विचारांतून प्रेरणा घेत आपण सामाजिक कार्य करत आलो, असे त्यांनी सांगितले.

भाऊराव काकतकर यांच्या सहवासाच्या आठवणी सांगताना त्यांनी साधना अंकाच्या प्रचाराच्या निमित्ताने झालेल्या संपर्काचा उल्लेख केला. त्या काळातील अनेक माणसे आजही आपल्याबरोबर आहेत, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
लाखो झाडे लावणे, हजारो गोबर गॅस प्लांट उभारणे आणि शेतीसाठी काम करणे यामागे साने गुरुजी आणि विनोबा भावे यांच्या विचारांची प्रेरणा असल्याचेही कागणीकर यांनी नमूद केले.
“मी स्वतःला मोठा समजत नाही. माझ्याबरोबर कार्य करणाऱ्या लोकांचे मी आभार मानतो. त्यांनी दिलेल्या साथीमुळेच हे कार्य करू शकलो,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
पुस्तकाचे लवकरच इंग्रजी भाषांतरही प्रकाशित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमात मराठी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणागीत सादर केले. सुभाष ओऊळकर यांनी स्वागत केले, सविता पवार यांनी प्रास्ताविक केले, तर नीला आपटे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. पुस्तक प्रकाशनानंतर मान्यवरांची भाषणे झाली. इंद्रजीत मोरे यांनी आभार मानले.
जल, जमीन, जंगल, शेती आणि सामान्य माणसाच्या जगण्यासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या एका सर्वोदयी कार्यकर्त्याच्या जीवनप्रवासाची नोंद करणारे ‘सर्वोदयाचा वाटसरू’ हे पुस्तक सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.





