बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाग्यनगर परिसरातून 10 मेंढ्यांची चोरी केल्याप्रकरणी तिघांना टिळकवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरीसाठी वापरण्यात आलेली कार आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भाग्यनगर परिसरातून 10 मेंढ्या चोरीला गेल्याची तक्रार मिळाल्यानंतर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 110/2026 अन्वये बीएनएस कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम पूजारी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी अशफाक खाजासाब साटी (42), रा. तेंगिनकेरी गल्ली, बेळगाव; मोहम्मद उबेद फयाज डोणी (19), रा. तेंगिनकेरी गल्ली, बेळगाव आणि मोहम्मद कैफ अयुबखान मसरगुप्पी (20), रा. बुकारी गल्ली, बेळगाव यांना ताब्यात घेतले.

आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट व्हीएक्सआय कार (क्र. KA-23-M-8448), अंदाजे 2 लाख रुपये किमतीची, तसेच 1 लाख 17 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 3 लाख 17 हजार रुपये आहे.
आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, चोरीच्या प्रकरणाचा पुढील तपास टिळकवाडी पोलीस करत आहेत.
या तपास पथकात पोलीस निरीक्षक परशुराम पूजारी, पीएसआय विश्वनाथ घंटामठ, पीएसआय अडिवेप्पा कुंडेद तसेच पोलीस कर्मचारी महेश पाटील, एस.एम. करलिंगण्णवर, लाडजिसाब मुल्तानी, नागेंद्र तळवार, परमानंद पवार आणि गंगा पार्वती यांचा सहभाग होता.





