बेळगाव लाईव्ह : हेरॉईन बाळगून वाहतूक केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला बेळगावच्या दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 7 वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा आणि 75 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
नागेश मधुकर भगत (33), रा. सावंतवाडी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 129/2024 अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम 21(b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने त्याला 7 वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच 75 हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त 2 वर्षे 6 महिन्यांची कठोर कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. न्यायाधीश गंगाधर के. एन. यांनी हा आदेश दिला.
11.02 ग्रॅम हेरॉईन जप्त
1 ऑक्टोबर 2024 रोजी बेळगाव शहर सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक नंदिश्वर कुंभार यांच्या पथकाला हेरॉईन वाहतुकीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्केट यार्डमधील शेतकरी भवन परिसरात कारवाई करण्यात आली.
यावेळी Hero Destini स्कूटरमधून हेरॉईनची वाहतूक करताना नागेश भगत याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 32 हजार 700 रुपये किमतीचे 11.02 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. हे हेरॉईन 109 छोट्या कागदी पुड्यांमध्ये आढळून आले होते.
यानंतर एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपास अधिकारी महिला पीएसआय त्रिवेणी नाटकर यांनी या प्रकरणात दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी अभियोक्ता भारती होसमनी यांनी सरकारच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली.
या प्रकरणात आरोपीला शिक्षा मिळवून देण्यासाठी तपास पथक आणि संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी कौतुक केले आहे.
बेळगाव शहर पोलिसांकडून अमली पदार्थांची बेकायदा वाहतूक, बाळगणे, विक्री आणि सेवनाविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थांबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी ती बेळगाव शहर पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.





