belgaum

पुण्याच्या MPSC आंदोलनात घुमला सीमालढ्याचा जयघोष

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पुण्यात एस. एम. जोशी पुलाशेजारी सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सीमाभागातून पाठिंबा मिळाला. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावहून पुण्यात जाऊन आंदोलनस्थळी उपस्थित राहत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला.

यावेळी कोल्हापूरचे MPSC विद्यार्थी विवेकानंद पाटील यांनी महाराष्ट्र अखंड ठेवण्याचे आवाहन करत “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” असा सीमालढ्याचा जोरदार जयघोष केला. त्यांच्या या घोषणेने पुण्यातील आंदोलनस्थळी उपस्थित सीमावासीय आणि कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष वेधले.

यावेळी बोलताना विवेकानंद पाटील यांनी सीमालढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाचा उल्लेख केला. “या चळवळीसाठी १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. पुन्हा या लढ्यासाठी रक्त सांडण्याची वेळ आली, तर १०८ वा हुतात्मा मी असेन,” अशी भावनिक भूमिका त्यांनी व्यक्त केली.

 belgaum

MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देतानाच महाराष्ट्राची अखंडता आणि बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील तरुणाईने एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर, अशोक घगवे, सूरज जाधव, निलेश काकतकर, सचिन दळवी, श्रीकांत बुवा तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाचे गणपती पाटील, विश्वनाथ पाखरे, वैराळ सुळकर, गंगाराम वीर, सातेरी पाटील, भुजंग पाखरे, मारुती पाटील, हनुमंत पाटील, संदीप बावकर, अर्जुन वीर, संतोष कुंभार, परशुराम पाटील, कार्तिक पाटील, भडकू बुत्ते वाडकर, विनायक आदी उपस्थित होते.

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सीमाभागातून मिळालेला हा पाठिंबा आणि पुण्यात घुमलेला “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” हा जयघोष सीमालढ्याच्या मुद्द्याला पुन्हा एकदा अधोरेखित करणारा ठरला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.