बेळगाव लाईव्ह:
“मातीचा देह मातीला शरण गेला… पण माणसाने दिलेली माया, संस्कार आणि आठवणी कधीच मातीला मिळत नाहीत.”
राकसकोप येथील ज्येष्ठ, प्रेमळ आणि मायेचा आधार असलेल्या कै. सावित्री रुक्माना मोरे यांचे गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी वयाच्या ९५व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने मोरे परिवारातील केवळ एक ज्येष्ठ व्यक्ती हरपली नाही, तर मायेची सावली, संस्कारांचा ठेवा आणि संपूर्ण कुटुंबाला जोडून ठेवणारा भावनिक आधार हरपला.
सावित्रीबाईंचे माहेर तुडये येथील कै. लक्ष्मण कलजी यांचे घर. साध्या शेतकरी कुटुंबात वाढलेल्या सावित्रीबाईंनी आयुष्यभर कष्ट, साधेपणा, संयम आणि माणुसकीची साथ सोडली नाही.
राकसकोपच्या मातीत संसार उभा करताना त्यांनी पती रुक्माना मोरे यांच्या शेती व्यवसायाला खंबीर साथ दिली. सुख-दुःखाची अनेक वादळे आली, मात्र कुटुंबासाठीची त्यांची माया कधीही कमी झाली नाही. “मुलांनी आणि नातवंडांनी शिकून मोठे व्हावे, आपल्या पिढीने भोगलेले कष्ट पुढच्या पिढीने भोगू नयेत,” हीच त्यांच्या मनातील कायमची इच्छा होती.
ग्रंथतुला करून आगळा सन्मान
शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या सावित्रीबाईंची दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी कुटुंबीयांनी ग्रंथतुला करून आगळ्या पद्धतीने सन्मान केला होता. या निमित्ताने राकसकोप येथील शाळेला ग्रंथ व पुस्तके भेट देण्यात आली. वयाच्या ९५व्या वर्षीदेखील ज्ञान आणि शिक्षणाविषयी असलेली त्यांची आस्था त्यांच्या संस्कारशील व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारी ठरली.
चार पिढ्यांना जोडणारा मायेचा धागा
मोरे परिवारातील चार पिढ्या आणि सुमारे ९० सदस्य गुण्यागोविंदाने नांदतात. या विशाल परिवारातील ज्येष्ठ म्हणून सावित्री आजींचे स्थान विलक्षण होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आपलेसे करणाऱ्या, कुणाबद्दलही आकस न ठेवणाऱ्या आणि नात्यांना मायेने जपणाऱ्या त्या खऱ्या अर्थाने कुटुंबाचा भावनिक आधारवड होत्या.
त्यांच्या पश्चात पुत्र रामचंद्र मोरे, निवृत्त सुभेदार अरुण मोरे व ॲटो इंजिनिअर शिवसंत संजय रुक्माना मोरे, कन्या मंजुळा ढेगसकर, सुना, नातवंडे व पणतवंडे असा मोठा परिवार आहे.
जय जवान… जय किसान… जय विज्ञान!
सावित्रीबाईंच्या संस्कारातून घडलेल्या त्यांच्या तीन पुत्रांच्या कर्तृत्वात त्यांच्या जीवनदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येते.
ज्येष्ठ पुत्र रामचंद्र मोरे यांनी बी.एस्सी.पर्यंत शिक्षण घेऊन शेतीची जबाबदारी सांभाळली.
दुसरे पुत्र अरुण मोरे यांनी बी.एस्सी.पर्यंत शिक्षण घेत भारतीय सैन्याच्या Army Medical Corps (AMC) मध्ये सेवा बजावली. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सुभेदार मेजर पदापर्यंत मजल मारत त्यांनी सुमारे ३० वर्षे देशसेवा केली आणि ते निवृत्त झाले.
कनिष्ठ पुत्र ॲटो इंजिनिअर शिवसंत संजय रुक्माना मोरे यांनी बेळगावच्या कॉलेज रोडवर ‘यश ॲटो’ या व्यवसायाची सुरुवात केली. दुचाकी स्पेअर पार्ट्स आणि दुरुस्तीपासून सुरू झालेल्या या व्यवसायाचा विस्तार विविध दुचाकी, इलेक्ट्रिक वाहने, ऑईल, टायर आणि बॅटरी व्यवसायांपर्यंत झाला. त्यांच्या व्यवसायातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.

एका मुलाने शेती सांभाळली, दुसऱ्याने देशसेवा केली आणि तिसऱ्याने उद्योगविश्व उभे केले—खऱ्या अर्थाने ‘जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान’ यांचा सुंदर संगमच या परिवारात पाहायला मिळतो.
संजय मोरे हे शिवसंदेश भारत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव यांचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या शिवकार्याची दखल घेत दि. १ जानेवारी २०१८ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सदरेवर त्यांचा ‘शिवसंत’ या उपाधीने गौरव करण्यात आला.
आई म्हणून सावित्रीबाई आपल्या मुलांच्या प्रत्येक यशाकडे अभिमानाने पाहत होत्या. मुलांचे कर्तृत्व म्हणजेच आपल्या आयुष्याचे सार्थक, हीच त्यांच्या मातृहृदयाची भावना होती.
पुढील पिढीतही संस्कारांची फळे
सावित्रीबाईंच्या संस्कारांची फळे पुढील पिढीतही दिसून येतात.
अजय रामचंद्र मोरे यांनी बी.कॉम.पर्यंत शिक्षण घेऊन ऑटोमोबाईल व्यवसायाची जबाबदारी सांभाळली आहे. विनायक रामचंद्र मोरे यांनी डिप्लोमा इन ऑटोमोबाईलचे शिक्षण घेऊन व्यवसायात योगदान दिले आहे. ज्योती रामचंद्र मोरे (झाजरी) यांचे पती शिक्षक आहेत.
आकाश अरुण मोरे यांनी BE, MBA आणि LLB असे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. आरती अरुण मोरे पुणे येथील ॲक्सिस बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्या विवाहित असून त्यांचे पती सैन्यदलात मेजर पदावर कार्यरत आहेत.
यश संजय मोरे बंगळुरू येथील InMobi कंपनीत कार्यरत आहेत, तर यशस्विनी संजय मोरे बेळगाव येथील KLE Dental College मध्ये शिक्षण घेत आहेत.
कन्या मंजुळा (कावेरी मारुती ढेगसकर, अनगोळ) यांच्या परिवारातील नागेश (BE), दिनेश (MBA), मीनाक्षी (प्राध्यापिका) आणि ज्योती (BE) यांनीही शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे.
सुना रेणुका, सुरेखा व सुषमा; नातसुना अरुणा व आहिल्या; तसेच अजित, विनायक, आकाश, यश, ज्योती, आरती व यशस्विनी ही नातवंडे आणि कौशल्या, राणोजी, रत्नोजी, सृष्टी, ओमकार, शिवांश, अर्जुन व विहानिका ही पणतवंडे—या सर्वांचा सावित्री आजींवर विशेष जीव होता.
त्यांच्यासाठी आजी म्हणजे केवळ घरातील ज्येष्ठ व्यक्ती नव्हत्या; त्या मायेचा आधार, संस्कारांची शिदोरी आणि आशीर्वादाची सावली होत्या.
अंत्यसंस्कार व रक्षा विसर्जन
दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी राकसकोप येथे सावित्रीबाईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी रक्षा विसर्जन विधी पार पडला.
आज त्यांच्या निधनाचा बारावा दिवस…
“मावशी… तुमचा प्रेमळ चेहरा आठवणींत दिसतो, तुमचे आपुलकीचे शब्द मनात घुमतात, तुमच्या मायेची ऊब आजही जाणवते आणि तुमचा आशीर्वाद देणारा हात अजूनही डोक्यावर असल्यासारखा वाटतो…”
माणूस जातो; पण त्याने दिलेली माया जात नाही. आयुष्य संपते; पण आठवणी संपत नाहीत. देह निघून जातो; पण आशीर्वादांची सावली कधीच दूर जात नाही.
तुमच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. मात्र तुम्ही जपलेली नाती, दिलेले संस्कार आणि केलेली माया पुढील पिढ्यांच्या रूपाने सदैव जिवंत राहील.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि मोरे परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.
कै. सावित्री रुक्माना मोरे यांना बाराव्या दिवशी विनम्र, अश्रुपूर्ण व भावपूर्ण आदरांजली!
मायेची सावली हरपली; आठवणी मात्र सदैव सोबत राहतील…
शब्दांकन — रवींद्र पाटील सर, कुद्रेमानी





