belgaum

नागरिकांची ससेहोलपट!अंडरपास कधी सुरू होणार?

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील चौथ्या रेल्वेगेट आणि केएलई इंजिनिअरिंग कॉलेजजवळील ‘बसवराज बोम्मई मार्गावरील’ भुयारी रस्त्याचे (अंडरपास) काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे. दक्षिण बेळगावला शहराच्या मुख्य भागाशी जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग बंद असल्याने परिसरातील हजारो नागरिकांना दररोज भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

हा मुख्य रस्ता बंद असल्यामुळे अनगोळ, वडगाव आणि उद्यमबाग औद्योगिक क्षेत्राकडे जाणाऱ्या-येणाऱ्या कामगारांना व नोकरदारांना लांबच्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत आहे. याशिवाय जवळच असलेल्या केएलई कॉलेज व परिसरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

योग्य पर्यायी व्यवस्था नसल्याने आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णवाहिका अडकून पडत आहेत. इतकेच नव्हे तर अंत्ययात्रा काढताना लोकांना थेट रेल्वे रुळांवरून किंवा अत्यंत धोकादायक मार्गाने जावे लागत आहे. पावसाळ्यात या अर्धवट काम झालेल्या भुयारी मार्गात पाणी साचून आरोग्य धोक्यात येत असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

 belgaum

दक्षिण बेळगावमधील वाहतूक समस्या कायमची सोडवण्यासाठी या भुयारी मार्गाची निर्मिती हाती घेण्यात आली होती, मात्र प्रशासकीय अनास्था आणि कंत्राटदाराच्या संथ कारभारामुळे हा प्रकल्प जनतेसाठी डोकेदुखी ठरला आहे.

खासदार जगदीश शेट्टर यांनी या गंभीर समस्येकडे वैयक्तिक लक्ष देऊन भुयारी मार्गाचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी जोरदार मागणी जोर धरत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.