बेळगाव लाईव्ह : झाड शहापूरजवळील दर्ग्याजवळ 2019 मध्ये झालेल्या प्राणघातक अपघात प्रकरणात टेम्पो चालक आणि मालकाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. साक्षीदारांच्या साक्षीमध्ये आढळलेल्या विसंगतींच्या आधारे दुसरे जेएमएफसी न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
30 डिसेंबर 2019 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास सचिन ज्योतिबा नाईक (वय 31) हे मोटरसायकल क्रमांक KA-22-ET-4277 वरून देसूरकडून बेळगावच्या दिशेने जात होते. झाड शहापूरजवळील दर्ग्याजवळ पोहोचले असताना खानापूरच्या दिशेने जाणाऱ्या 407 टेम्पो क्रमांक KL-40-8244 ने कथितरीत्या ताबा गमावून चुकीच्या बाजूला जात मोटरसायकलला समोरून धडक दिली.
या अपघातात सचिन नाईक गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याच दिवशी सायंकाळी सुमारे 5 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर टेम्पो चालकाने पोलिसांना घटनेची माहिती न देता अपघातस्थळी टेम्पो सोडून तेथून निघून गेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता.
या प्रकरणी मृताचे भाऊ संदीप ज्योतिबा नाईक (रा. पोटे गल्ली, देसूर) यांनी बेळगाव ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम 279, 304(अ) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 134 व 187 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
तपासादरम्यान टेम्पो चालक परशराम उमाजी पाखरे (वय 30, रा. ईदलहोंड, ता. खानापूर) याचा वाहन चालविण्याचा परवाना मुदतबाह्य असल्याचे, तसेच टेम्पोचा विमाही संपलेला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे टेम्पो मालक रामा पुंडलिक गुरव (वय 40, रा. सिंगीनकोप, पोस्ट ईदलहोंड, ता. खानापूर) याच्याविरुद्धही मोटार वाहन कायद्यातील कलम 5, 180, 146 आणि 196 अन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
मात्र, न्यायालयीन सुनावणीदरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये आणि साक्षींमध्ये विसंगती आढळून आल्याने अभियोजन पक्षाचे आरोप सिद्ध झाले नसल्याचे न्यायालयाने मानले. त्यामुळे दुसरे जेएमएफसी न्यायालयाने टेम्पो चालक परशराम पाखरे आणि मालक रामा गुरव या दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आरोपींच्यावतीने अॅड. मारुती कामानाचे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.





