belgaum

घसा बसण्याकडे दुर्लक्ष नको; डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या आरोग्य टिप्स

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : आवाज बसणे, घशातून भोगरा किंवा रफ आवाज येणे, तसेच बोलताना त्रास होणे ही समस्या अनेकांना जाणवते. हवामानातील बदल, धूळ-धूर, सर्दी, ॲलर्जी किंवा आवाजाचा अतिवापर यामुळे घसा बसू शकतो. मात्र ही समस्या वारंवार होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य निदान करून घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी सांगितले.

स्वरयंत्राला सूज येणे, स्वरयंत्राच्या तारांवर गाठी निर्माण होणे, थायरॉईडशी संबंधित समस्या किंवा इतर काही गंभीर कारणांमुळेही आवाजात बदल होऊ शकतो. सतत माईकवर मोठ्याने बोलणे, सार्वजनिक भाषणे किंवा गायनामुळे स्वरयंत्रावर ताण येऊन आवाज बसण्याची शक्यता वाढते.

घसा बसल्यास कोमट पाणी पिणे, कोमट पाण्याच्या गुळण्या करणे आणि आवाजाला विश्रांती देणे फायदेशीर ठरू शकते. आहारातही काळजी घेणे आवश्यक असून अतिआंबट, तेलकट तसेच अतिथंड पदार्थ, बर्फ, कोल्ड ड्रिंक्स आणि फ्रिजमधील पदार्थ टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 belgaum

मध आणि तुळशीचा अर्क यांसारखे घरगुती उपाय काहींना आराम देऊ शकतात. मात्र कोणताही उपाय प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. विशेषतः घसा वारंवार बसत असल्यास किंवा आवाजातील बदल दीर्घकाळ टिकत असल्यास स्वतःहून औषधोपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

होमिओपॅथीमध्येही घसा व स्वरयंत्राशी संबंधित तक्रारींसाठी विविध औषधांचा वापर केला जातो. मात्र Merc Iod Rubrum, Merc Sol यांसारखी औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नयेत. योग्य कारणाचे निदान करूनच उपचार घेणे अधिक सुरक्षित आहे.

“आवाज हा आपल्या आरोग्याचा महत्त्वाचा संकेत आहे. वारंवार आवाज बसत असेल तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्यामागचे कारण तपासून घेणे आवश्यक आहे,” असा आरोग्यविषयक सल्ला डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.