belgaum

बेळगावकरांसाठी पुन्हा सजली सर्कसची जादुई दुनिया

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : मोबाईल आणि डिजिटल मनोरंजनाच्या युगात हरवत चाललेली सर्कसची जादू पुन्हा एकदा बेळगावकरांच्या भेटीला आली आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस शहरात दाखल झाली असून, सीपीएडी मैदानावर आजपासून तिचे प्रयोग सुरू होत आहेत.

जंबो सर्कसचे मॅनेजर टायटस वर्गिस यांनी रविवारी बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आफ्रिका, टांझानिया, इथिओपिया, मणिपूर यांसह देश-विदेशातील सुमारे ६० कलाकार या सर्कसमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची खास मेजवानी ठरणार आहे.

जग्लिंग, रोलर अॅक्ट, डबल साडी अॅक्रोबॅट, कॉमिक चेअर अॅक्रोबॅट, बास्केटबॉल अॅक्ट, कॅन्डल बॅलन्स आणि रोप अॅक्ट अशा थरारक कसरती प्रेक्षकांना अनुभवता येणार आहेत. प्रत्येक प्रयोगात कलाकारांच्या कौशल्यासोबतच धाडस आणि अचूकतेचा रोमांच पाहायला मिळणार आहे.

 belgaum

विशेष म्हणजे, प्राण्यांच्या प्रदर्शनावर निर्बंध आल्यानंतरही सर्कसची कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न जंबो सर्कसकडून केला जात आहे. विविध देशांतील कलाकारांना एकत्र आणून पारंपरिक सर्कसला आधुनिक साहसी आणि मनोरंजक कार्यक्रमांची जोड देण्यात आली आहे.

२ ऑक्टोबर १९७७ रोजी बिहारमधील धनापूर येथे एम.व्ही. शंकरन यांच्या नेतृत्वाखाली जंबो सर्कसचा पहिला प्रयोग झाला. तेव्हापासून देश-विदेशात हजारो प्रयोग करत या सर्कसने आपली परंपरा कायम ठेवली आहे. सध्या एम.व्ही. शंकरन यांचे पुत्र अजय शंकर आणि अशोक शंकर सर्कसची धुरा सांभाळत आहेत.

सीपीएडी मैदानावर दररोज दुपारी १, सायंकाळी ४ आणि रात्री ७ वाजता प्रयोग होणार आहेत. कुटुंबासह सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आनंद घेता यावा, अशा पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

डिजिटल स्क्रीनपासून काही क्षण दूर होत, प्रत्यक्ष कसरतींचा थरार आणि सर्कसच्या रंगीबेरंगी दुनियेचा अनुभव घेण्याची संधी बेळगावकरांना मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जंबो सर्कसचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला रविंदर, रेणुका, तानिया वसिम, अँथनी, नव्वा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.