बेळगाव लाईव्ह:ऋषिपंचमीनंतर येणाऱ्या उंदीर बीजच्या पारंपरिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खानापूर शहरात वर्षातून एकदाच भरणारा बकऱ्यांचा मोठा बाजार रविवारी गजबजला. हुंदरीच्या पारंपरिक प्रथेसाठी बकरी खरेदी करण्यासाठी तालुक्यातील विविध गावांसह परिसरातून नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले होते.
खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी घरच्या घरी पाळलेल्या बकऱ्या विक्रीसाठी घेऊन आले होते. तसेच परिसरातील विविध ठिकाणांहून विक्रेते मोठ्या संख्येने दाखल झाल्याने बाजारात बकऱ्यांची मोठी आवक झाली होती. सकाळपासूनच खरेदीदार आणि विक्रेत्यांची गर्दी झाल्याने बाजार परिसर गजबजून गेला.
उंदीर बीजच्या निमित्ताने गावागावांत हुंदरीची पारंपरिक प्रथा पाळली जाते. या सोहळ्यासाठी बकऱ्यांची खरेदी केली जात असल्याने खानापूरचा हा बाजार वर्षातून एकदाच मोठ्या प्रमाणात भरतो. लहान गावांमध्ये साधारण २० ते २५, तर मोठ्या गावांमध्ये ५० ते १०० किंवा त्याहून अधिक बकऱ्यांची खरेदी केली जात असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

यंदा बाजारात बकऱ्यांना सात हजारांपासून थेट ५५ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. बकऱ्यांच्या आकारमानानुसार आणि वजनानुसार दर ठरत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
खानापूरच्या या एकदिवसीय बाजारात यंदा तीन ते साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खानापूरसह नांदगड, बीडी, कित्तूर आणि बागेवाडी परिसरातही उंदीर बीजच्या निमित्ताने बकऱ्यांचे बाजार भरत असल्याने या पारंपरिक बाजारपेठांमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.
उंदीर बीजच्या पारंपरिक सोहळ्याची लगबग, बकऱ्यांची मोठी आवक आणि कोट्यवधींच्या व्यवहारामुळे खानापूरचा वर्षातून एकदाच भरणारा बकऱ्यांचा बाजार यंदाही चर्चेचा विषय ठरला.





