बेळगाव लाईव्ह : कर्नाटकातील ईडीच्या कारवाईवरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ईडीकडून नोटीस मिळाल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे सादर करून वस्तुस्थिती स्पष्ट केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
गेल्या आठवडाभरापासून राज्यात ईडीच्या कारवाईबाबत विविध चर्चा सुरू आहेत. यासंदर्भात आपण यापूर्वी दोन-तीन वेळा पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, काही माध्यमांमध्ये आपल्या वक्तव्यांचा वेगळा अर्थ लावून बातम्या प्रसिद्ध केल्या जात असल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे जारकीहोळी यांनी म्हटले.
ईडीकडून नोटीस आल्यानंतर संबंधित कागदपत्रे आणि आवश्यक माहिती तपास यंत्रणेला देण्यात येईल, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
दरम्यान, एका वृत्तपत्रात ‘ईडीला आव्हान’ अशा आशयाची बातमी प्रसिद्ध झाल्याचा संदर्भ देत जारकीहोळी यांनी नाराजी व्यक्त केली. आपण आपल्या वक्तव्यात ‘आव्हान’ हा शब्द कुठेही वापरलेला नाही. ईडी ही तपास यंत्रणा आहे. तिच्याकडून नोटीस मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे ईडीला आव्हान देण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, भविष्यात न्यायालयात कागदपत्रे सादर करण्याची वेळ आली, तरी त्याचा अर्थ ‘न्यायालयाला आव्हान’ असा लावू नये, असेही जारकीहोळी यांनी सांगितले.
माध्यमांनी आपली वक्तव्ये जशीच्या तशी आणि वस्तुस्थितीच्या आधारे जनतेसमोर मांडावीत. अनावश्यक शब्दप्रयोग करून चुकीचा अर्थ किंवा संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींना केले.





