belgaum

बेळगाव गणेशोत्सवासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त; १,१५६ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यंदा शहरात तब्बल १,१५६ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून, त्यापैकी २१ मूर्ती नव्याने प्रतिष्ठापित होणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी पत्रकार परिषदेत बंदोबस्ताची माहिती देत नागरिक आणि गणेश मंडळांना शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

गणेशमूर्तींच्या आगमन सोहळ्याला ४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून आतापर्यंत सुमारे ७५ गणेशमूर्तींचे शहरात आगमन झाले आहे. गणेशोत्सवासाठी दोन टप्प्यांत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यातील बंदोबस्त गणेश विसर्जनापर्यंत कायम राहणार आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधून तसेच विशेष पथकांमधून अतिरिक्त मनुष्यबळ मागविण्यात आले आहे. सीएआर, केएसआरपी आणि आरएएफच्या जवानांचीही शहरात नियुक्ती करण्यात आली असून, संवेदनशील भागांमध्ये पथसंचलन करून परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

 belgaum

१,२६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून नजर

शहरातील अतिसंवेदनशील भागांमध्ये तब्बल १,२६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांकडून २४ तास परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे.

शहराचे ३२ सेक्टरमध्ये विभाजन करण्यात आले असून, प्रत्येक सेक्टरसाठी पीएसआय आणि एएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा सीपीआय आणि दोन एसीपी यांच्या देखरेखीखाली ही व्यवस्था कार्यरत राहणार आहे. याशिवाय शहरात १२० फिक्स पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत.

प्रत्येक गणेश मंडपात तीन शिफ्टमध्ये किमान दोन पोलिस कर्मचारी २४ तास तैनात राहणार आहेत. शहरातील धार्मिक स्थळे आणि महत्त्वाच्या ठिकाणीही स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शहराच्या प्रवेशद्वारांवर १९ चेकपोस्ट

शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गांवर १९ चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी संशयित व्यक्ती आणि वाहनांची २४ तास तपासणी केली जाणार आहे.

गणेशोत्सव काळात समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिला.

प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून २४ रौडी व समाजकंटकांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. एका व्यक्तीविरुद्ध गुंडा कायदा आणि एका व्यक्तीविरुद्ध कोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहरातील १,०९९ रौडींचे बाँडओव्हर करण्यात आले असून, बाँडओव्हरचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ३ लाख ६५ हजार रुपये सरकारजमा करण्यात आले आहेत.

पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन; आदर्श मिरवणुकीला पुरस्कार

गणेशोत्सवातील पारंपरिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी पोलिस विभागाने यंदा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. पारंपरिक वाद्यांचा वापर करून शिस्तबद्ध आणि आदर्श गणेश विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या मंडळांना पोलिस विभागाच्या वतीने पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी तीन पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यामुळे गणेश मंडळांनी डॉल्बी-डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देत शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध मिरवणुका काढाव्यात, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले.

डॉल्बी-डीजे आणि लेझरवर बंदी

गणेशोत्सवादरम्यान डॉल्बी, डीजे आणि लेझर लाईटच्या वापरावर बंदी असल्याचे पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले. बंदी असतानाही अशा साधनांचा वापर करणारे मंडळ आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

२५ सप्टेंबरपासून विसर्जन मिरवणुका

यंदा अनंत चतुर्दशी १२व्या दिवशी येत असल्याने गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांना २५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. शहरात प्रमुख सहा ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून, ग्रामीण भागात विविध नदी, तलाव आणि विहिरींमध्ये विसर्जन केले जाणार आहे.

गणेशोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासन, महापालिका, वन विभाग, अग्निशमन दल, पीडब्ल्यूडी, हेस्कॉम आणि प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. गणेश मंडळांना परवानगी मिळणे सुलभ व्हावे यासाठी शहरातील १२ पोलिस ठाण्यांमध्ये ३१ ऑगस्टपासून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.

गणेश महामंडळाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या आयोजकांसोबत विविध टप्प्यांवर बैठका घेऊन शासन आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गणेश प्रतिष्ठापना आणि विसर्जनाच्या दिवशी शहरात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि भक्तिभावाने साजरा करावा. कोणत्याही व्यक्तीने कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.