बेळगाव लाईव्ह : आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सीमाभागातून मायेची साथ मिळाली आहे. श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडस्कर यांच्या नेतृत्वाखालील सीमाभागातील शिष्टमंडळाने हा उपक्रम हाती घेत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला.
आंदोलनाच्या धावपळीत आणि आपल्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या संघर्षात विद्यार्थ्यांना आपलेपणाचा आधार मिळावा, या भावनेतून शिष्टमंडळाने आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. सीमाभागातील नागरिक आणि कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या भेटीतील सर्वाधिक भावस्पर्शी क्षण ठरला तो बेळगावच्या प्रसिद्ध भाकर-चटणीचा आणि खास कुंद्याचा! सीमाभागातून आणलेली ही खास भेट आंदोलक विद्यार्थी विवेकानंद पाटील यांना प्रेमाने भरवण्यात आली. आपल्या मातीची चव आणि आपुलकीची ऊब जपणाऱ्या या कृतीतून विद्यार्थ्यांच्या संघर्षाप्रती असलेली बांधिलकी व्यक्त झाली.

रोहित पवारांचा घोंगडी घालून सत्कार
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आमदार रोहित पवार यांचाही रमाकांत कोंडस्कर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या वतीने कांबळ अर्थात घोंगडी घालून विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनाच्या ठिकाणी घोषणांचा आवाज घुमत असताना सीमाभागातून आलेल्या शिष्टमंडळाने दिलेला हा मायेचा घास विद्यार्थ्यांसाठी आपुलकीचा क्षण ठरला. संघर्षाच्या काळात आपल्या पाठीशी कोणीतरी खंबीरपणे उभे आहे, ही जाणीव देणाऱ्या या उपक्रमातून सीमाभागातील एकजूट आणि माणुसकीची भावना अधोरेखित झाली.
यावेळी श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखालील सीमाभागातील शिष्टमंडळातील अमित देसाई, राजेंद्र बैलूर, विनोद बिर्जे, दिनेश जगताप, अजय सावंत, मंदार पाबळ, रईस बागवान, प्रणय पाटील आदी उपस्थित होते.





