बेळगाव लाईव्ह : जिद्द, मेहनत आणि जिंकण्याची इच्छाशक्ती असेल, तर ग्रामीण भागातील मुलीही क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घेऊ शकतात, याचा प्रत्यय कंग्राळी बुद्रुक येथील स्वरा अनिल पावशे आणि माधुरी गजानन पाटील या दोघींनी दिला आहे. जिल्हास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी गावाचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक करत गजराज बुक स्टॉल आणि बाळ संभाजी युवक मंडळाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
बेळगाव शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत स्वरा चावशे हिने १०० मीटर आणि ८० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तर माधुरी पाटील हिने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. दोघींच्या या यशामुळे कंग्राळी बुद्रुकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांची तयारी सुरू असून, गावकऱ्यांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कौतुकाची थाप अन् पुढील यशासाठी प्रोत्साहन
या गुणवंत खेळाडूंच्या सत्कार समारंभाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली. ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष यल्लोजी पाटील, माजी सदस्य दत्ता पाटील आणि अमोल पाटील यांच्या हस्ते पूजन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्ता पाटील होते.
गजराज बुक स्टॉलचे मालक अमोल पाटील यांच्या वतीने स्वरा आणि माधुरी यांना सन्मानचिन्ह, पदक आणि शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले. खेळातील यशाची दखल घेत मिळालेली ही कौतुकाची थाप दोन्ही खेळाडूंसाठी आगामी स्पर्धांच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरली.
यावेळी यल्लोजी पाटील यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करताना विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेतही यश संपादन करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
दादासाहेब भदरगडे यांनीही खेळाडूंचे कौतुक केले. तरुण पिढीने सुदृढ आरोग्यासाठी आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी क्रीडा क्षेत्राकडे लक्ष द्यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळालाही महत्त्व द्यावे, असे सांगितले. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्याची काळजी घ्यावी आणि क्रीडा क्षेत्रात आपले कौशल्य सिद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ग्रामीण भागातील गुणवंतांना प्रोत्साहनाची गरज
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आणि क्षमता असते. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना योग्य वेळी मिळणारे प्रोत्साहन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते. स्वरा आणि माधुरी यांच्या यशाचा गौरव करणारा हा उपक्रम इतर विद्यार्थ्यांनाही खेळाकडे वळण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.
या कार्यक्रमाला बाळ संभाजी युवक मंडळाचे कार्यकर्ते तसेच दादासाहेब भदरगडे, अमोल पाटील, विश्वनाथ पाटील, यल्लोजी पाटील, मनोज पाटील, सुधीर पाटील, भूषण पाटील, माया पाटील, शितल पावशे, सोनम पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन यल्लोजी पाटील यांनी केले.





