belgaum

ऊसदर आंदोलनाचा भडका;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :ऊसाला योग्य दर मिळावा आणि साखर विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यात शेतकऱ्यांना योग्य वाटा मिळावा, या मागणीसाठी बेळगावात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने गुरुवारी अधिक तीव्र स्वरूप धारण केले. जमावबंदीचे आदेश लागू असतानाही जेलभरो आंदोलन करण्यासाठी मुक्तिमठ परिसरात जमलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. यावेळी झालेल्या धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमकीनंतर शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांच्यासह शंभरहून अधिक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, हिंडलगा कारागृहाच्या दिशेने पदयात्रा काढण्याचा प्रयत्न करणारे शशिकांत गुरूजी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याने आंदोलनात आणखी संतापाची भर पडली.

शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ राणी चन्नम्मा सर्कल येथे शेकडो शेतकरी एकत्र आले. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नेत्यांची बिनशर्त सुटका आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी मानवी साखळी करून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र जमावबंदीच्या आदेशाचे कारण देत पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर अनेक आंदोलकांना बळजबरीने ताब्यात घेण्यात आले. दुसरीकडे, जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही शेतकरी नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांना नंतर सोडण्यात आल्याचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले. शहरातील शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी बीएनएस कलम १६३ लागू केल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर शेतकरी नेते चुन्नाप्पा पुजारी यांनी आंदोलन अधिक व्यापक करण्याचा इशारा दिला. उसाच्या पहिल्या हप्त्यात प्रतिटन ३,६५० रुपये दर द्यावा, तसेच साखर विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचे ७५:२५ या प्रमाणात वाटप करून शेतकऱ्यांना ७५ टक्के हिस्सा देण्याबाबत लेखी करार करावा, अशी मागणी त्यांनी केली

 belgaum

. सरकारने मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन बेंगळुरूतील फ्रीडम पार्कपर्यंत नेऊन राज्यव्यापी ‘कर्नाटक बंद’ पुकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याचे आवाहन करताना राज्यभरातील ऊस उत्पादकांसाठी एकसमान दर निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली.

शशिकांत गुरूजी यांची पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर त्यांनी राज्यातील शेतकरी आणि शेतकरी नेत्यांना गुर्लापूर येथे एकत्र येण्याचे आवाहन केले. सायंकाळी आयोजित बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा आणि राज्यव्यापी लढ्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बेळगावातील ऊसदर आंदोलन आता केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता राज्यव्यापी संघर्षाच्या दिशेने वाटचाल करत असून, सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेते, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.