बेळगाव लाईव्ह : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळी मदतीची रक्कम दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी २,५०० रुपये असलेली मदत आता ५ हजार रुपये करण्यात आली असून, दोन टप्प्यांत ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यादगिरी जिल्ह्यात या मदत वितरणाचा प्रारंभ केला.
शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीद्वारे मदत जमा करण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांनी बटण दाबून केला. यावेळी बोलताना त्यांनी पहिल्या टप्प्यात प्रत्येक शेतकऱ्याला २,५०० रुपये देण्यात येणार असून, त्यासाठी १,२५० कोटी रुपयांचा निधी जारी करण्यात येत असल्याचे सांगितले. दिवाळीनंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी २,५०० रुपये जमा केले जातील. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एकूण ५ हजार रुपये मदत मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री परमेश्वर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना, विधानसभेत प्रत्येक एकरासाठी मदत देण्याचे आश्वासन दिले नव्हते, तर प्रत्येक शेतकऱ्याला मदत देण्याचे जाहीर केले होते, असे सांगितले. त्यानुसार राज्यातील ५७ लाख शेतकरी लाभार्थ्यांना ही मदत वितरित करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात २,५०० रुपये इनपुट सबसिडी म्हणून दिले जात असून, काही दिवसांनंतर दुसऱ्या टप्प्यातही तेवढीच रक्कम जमा केली जाणार आहे. दोन एकरांपेक्षा अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही एकूण ५ हजार रुपयेच मदत मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.




