बेळगाव लाईव्ह: एक नोव्हेंबरच्या काळ्या दिनानंतर बेळगावमध्ये पुन्हा एकदा मराठी-कन्नड वाद निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केला आहे. काही कन्नड संघटनांचे कार्यकर्ते मराठी भाषिकांना डिवचण्याचा आणि मराठी भाषेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या पार्श्वभूमीवर समितीने प्रशासनाची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने एक नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या विरोधात काळा दिन अत्यंत गांभीर्याने आणि शांततेत पाळण्यात आला. या माध्यमातून सीमाभागातील मराठी जनतेच्या तीव्र भावना देशवासीयांसमोर मांडण्यात आल्या. यंदाच्या काळ्या दिनी युवकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत आपली ताकद दाखवून दिली.
मात्र, राज्योत्सव दिनापूर्वी आणि त्यानंतर काही संघटनांकडून मराठी जनतेला डिवचण्याचे प्रयत्न होत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. अशा प्रकारांमुळे शहरातील शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या संदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठी जनतेचे शिष्टमंडळ शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेणार असून त्यांना निवेदन सादर करणार आहे.
या निवेदनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी जनतेने शुक्रवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



