belgaum

ओलमणीतील म्हैस चोरीचा छडा; तीन आरोपी अटकेत!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील ओलमणी येथील शेतकऱ्याच्या शेतातून चोरीला गेलेल्या दोन म्हशींचा शोध लावण्यात खानापूर पोलिसांना यश आले आहे. या चोरीप्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, चोरीला गेलेल्या दोन्ही म्हशी हस्तगत करून शेतकरी परशराम महादेव पवार यांच्या स्वाधीन केल्या आहेत. सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या म्हशी परत मिळाल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या चोरीप्रकरणी पोलिसांनी भीमाप्पा अडिवेप्पा पुजेरी (वय ३४, रा. करवी), भरमाप्पा रमेश पुजेरी (वय २२, रा. भरमणट्टी) आणि यल्लाप्पा सत्त्याप्पा गुंडलगुप्पी (वय १९, रा. हुल्यानूर, पोस्ट आष्टे) या तिघांना ताब्यात घेतले आहे.

 belgaum

शेतात बांधलेल्या दोन म्हशी पळवल्या

ओलमणी येथील शेतकरी परशराम महादेव पवार यांची सर्व्हे क्रमांक २५३ मध्ये जांबोटी-खानापूर रस्त्यालगत शेतजमीन आहे. ते गेल्या तीन वर्षांपासून दुग्धव्यवसाय आणि घरगुती वापरासाठी शेतात एक गाय आणि चार म्हशी पाळत होते. ही जनावरे शेतातच बांधून ठेवण्यात येत होती.

दरम्यान, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८ ते २४ ऑक्टोबर रोजी पहाटे ६ या वेळेत शेतात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी तेथे प्रवेश केला. शेतात बांधलेल्या चार म्हशींपैकी दोन म्हशी सोडवून चोरून नेल्या. या दोन्ही म्हशींची किंमत अंदाजे १ लाख ४० हजार रुपये होती.

या घटनेनंतर परशराम पवार यांनी खानापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास सुरू करून चोरीचा छडा लावला. तिघांना ताब्यात घेत दोन्ही म्हशी शोधून काढण्यात पोलिसांना यश आले.

खानापूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस निरीक्षक एल. एच. गोवंडी यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय सिद्रामप्पा उन्नद, हेड कॉन्स्टेबल जगदीश काद्रोळी, यलिगार, बसवराज तंगोजी तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुरेश इरगार, सिद्राम हसरे आणि सुनील शिरगुप्पी यांनी या तपासात सहभाग घेतला.

पोलिसांच्या प्रयत्नांमुळे चोरीला गेलेले पशुधन पुन्हा मिळाल्याने शेतकरी परशराम पवार यांनी समाधान व्यक्त केले. खानापूर पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.