belgaum

प्रज्वल रेवण्णा यांच्या हिंडलगा कारागृहातील स्थलांतराला तात्पुरती स्थगिती!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : माजी खासदार आणि बलात्कार प्रकरणात शिक्षा झालेल्या प्रज्वल रेवण्णा यांना परप्पन अग्रहार मध्यवर्ती कारागृहातून बेळगावातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात हलविण्याच्या आदेशाला राज्याच्या कारागृह व सुधारणा सेवा विभागाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र, इतर सात कैद्यांच्या स्थलांतराला विभागाने संमती दिल्याचे वृत्त आहे.

परप्पन अग्रहार कारागृहात बेकायदेशीरपणे मोबाईलचा वापर केल्याच्या प्रकरणाची बंगळुरू पोलिसांनी गंभीर दखल घेतली होती. यानंतर प्रज्वल रेवण्णा यांच्यासह सात आरोपींना अन्य कारागृहांत हलविण्याची शिफारस करण्यात आली होती. या शिफारशीच्या आधारे कारागृह विभागाने प्रज्वल रेवण्णा यांना हिंडलगा कारागृहात हलविण्याचा आदेश दिला होता.

दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी परप्पन अग्रहार कारागृहावर छापा टाकला होता. यावेळी प्रज्वल रेवण्णा यांच्या सेलमध्ये मोबाईल आणि पेनड्राइव्ह आढळून आल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात प्रज्वल रेवण्णा यांच्यासह सात आरोपी आणि कारागृहातील वॉर्डन प्रकाश गावे यांना पोलिसांनी अटक केली होती.

 belgaum

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने बनावट जामीन आदेश तयार केल्याच्या प्रकरणातील कैदी शंकर आणि अरमुगम, तसेच कारागृहातील प्रथम श्रेणी सहायक श्रीकांत यांना अन्य कारागृहात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात कारागृहातील वरिष्ठ अधिकारी सोमशेखर यांनाही अटक करण्यात आली आहे.

प्रज्वल रेवण्णा यांच्या स्थलांतरावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोमशेखर यांच्याकडे होती. मात्र, त्यांनाच अटक झाल्यानंतर सुरक्षा आणि देखरेखीच्या दृष्टीने स्थलांतराच्या आदेशाचा पोलीस महासंचालक (कारागृह) आलोक कुमार यांनी फेरविचार सुरू केला. त्यामुळे प्रज्वल रेवण्णा यांना हिंडलगा कारागृहात हलविण्याच्या प्रक्रियेला सध्या तात्पुरती स्थगिती मिळाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.