पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली कारवाई; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही क्लबमधील व्यवहार तातडीने बंद
बेळगाव लाईव्ह : शहरातील प्रतिष्ठित क्लब, पब आणि हॉटेल्सवर बेळगाव शहर पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून तपासणी केली. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ४० हून अधिक ठिकाणी ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या तपासणीदरम्यान काही क्लबमध्ये नियमांचे उल्लंघन करून विविध उपक्रम सुरू असल्याचे आढळून आले. काही ठिकाणी अल्पवयीन मुले आढळली, तर काही क्लबमध्ये निर्धारित नियमांचे पालन न करता मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपकांचा वापर केला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळलेल्या काही क्लब आणि पबमधील उपक्रम पोलिसांनी तातडीने बंद केले. तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, प्रभावशाली राजकीय नेत्यांशी संबंधित काही प्रतिष्ठित क्लबवरही या मोहिमेदरम्यान छापे टाकण्यात आल्याने शहरात या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.
शहरातील क्लब, पब आणि हॉटेल्समध्ये नियमांचे काटेकोर पालन व्हावे, तसेच अल्पवयीन व्यक्तींना प्रवेश आणि ध्वनिक्षेपकांच्या वापरासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांनी ही मोहीम हाती घेतल्याचे समजते. नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत या मोहिमेतून मिळत आहेत.





