belgaum

शुभम शेळके यांच्यावरील कारवाईचा आदेश रद्दबातल

0
SHubham shelke yuva samiti
 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आणि युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाईचा आदेश पाचव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने रद्दबातल ठरविला आहे. पोलीस उपायुक्तांनी १० जून २०२६ रोजी बजावलेल्या आदेशाला न्यायालयाने रद्द केल्याने शुभम शेळके यांना दिलासा मिळाला आहे.

शुभम शेळके यांनी समाजमाध्यमांवर प्रक्षोभक वक्तव्य करून मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्याचे अधिकारी एस. डी. कट्टीमनी यांनी २ जून २०२६ रोजी पोलीस उपायुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या आधारे पोलीस उपायुक्तांनी १० जून २०२६ रोजी शुभम शेळके यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार, १२ जून रोजी उपायुक्त कार्यालयात हजर राहून एक वर्षाच्या कालावधीसाठी पाच लाख रुपयांचा बाँड आणि तितक्याच रकमेचा एक जामीनदार देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

 belgaum

या आदेशाला शुभम शेळके यांच्या वतीने अॅड. महेश बिर्जे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद

पोलीस उपायुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा युक्तिवाद शुभम शेळके यांच्या वतीने करण्यात आला. पोलिसांनी केवळ आपल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले; मात्र शुभम शेळके यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली नाही. ही प्रक्रिया न्यायाच्या तत्त्वांविरोधात असून, केवळ त्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला.

दुसरीकडे, सरकारी वकिलांनी शुभम शेळके यांच्याविरोधात बेळगाव परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांच्या वक्तव्यांमुळे शहरातील शांततेला बाधा निर्माण होण्याची शक्यता असून, मराठी आणि कन्नड भाषिकांमध्ये तेढ निर्माण होत असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. त्यामुळे संबंधित कारवाई योग्य असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पाचव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने पोलीस उपायुक्तांनी १० जून २०२६ रोजी बजावलेला आदेश रद्दबातल ठरविला.

वकिलांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती

या प्रकरणात अॅड. महेश बिर्जे यांच्यासह अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. वैभव कुट्रे, अॅड. अश्वजित चौधरी आणि अॅड. रिचमन रिकी यांनी शुभम शेळके यांच्या वतीने काम पाहिले.

यावेळी धनंजय पाटील, अशोक घगवे, नारायण मुचंडिकर, सूरज जाधव, श्रीकांत नांदूरकर आणि जोतिबा येळ्ळूरकर उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.