belgaum

घरफोड्यांचे सत्र उघड; आरोपीला अटक, २६.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून २६ लाख ५३ हजार ४०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली स्कूटी आणि घरफोडीसाठी वापरण्यात येणारी साधने जप्त करण्यात आली आहेत. पिरनवाडी, हुंच्यानट्टी आणि मच्छे परिसरातील सहा घरांमध्ये चोरी केल्याची कबुली आरोपीने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तक्रारीनंतर पोलिसांकडून तपास

२ ऑक्टोबर २०२६ रोजी हुंच्यानट्टी येथील स्वामी विवेकानंद नगरमध्ये राहणाऱ्या लक्ष्मी सिद्राम रामण्णावर यांच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

या तक्रारीच्या आधारे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा क्रमांक २१८/२०२६ नोंदवून तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनिगौड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली.

 belgaum

दिवसा स्कूटीवरून फिरून घरफोड्या

या प्रकरणाच्या तपासादरम्यान रोहन रूपेश पाटील (वय ३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो मूळचा गणेशपूर येथील क्रांतीनगरचा रहिवासी असून सध्या टिळकवाडीतील दुसऱ्या रेल्वे गेटजवळील श्रीहरी अपार्टमेंटमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

चौकशीदरम्यान आरोपी दिवसा स्कूटीवरून फिरत पिरनवाडी, हुंच्यानट्टी आणि मच्छे परिसरातील घरांना लक्ष्य करत असल्याचे समोर आले. या परिसरातील एकूण सहा घरांमध्ये चोरी केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

२६.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपीकडून १६१ ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत २३ लाख ८८ हजार ४०० रुपये आहे, तसेच एक किलो चांदीच्या वस्तू, ज्यांची किंमत दोन लाख ३० हजार रुपये आहे, जप्त केल्या आहेत.

याशिवाय चोरीसाठी वापरण्यात आलेली केए-२२/ईयू-२१६० क्रमांकाची स्कूटी, ज्याची किंमत ३५ हजार रुपये आहे, तसेच लोखंडी उळी, कटर, स्क्रू-ड्रायव्हर आणि पाना यांसारखी साधनेही जप्त करण्यात आली आहेत.

या सर्व जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २६ लाख ५३ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या पथकाचे कौतुक

या गुन्ह्याचा छडा लावून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनिगौड, पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवाई, लक्ष्मप्पा जोडट्टी, वाय. डी. सरनाईक तसेच पोलीस कर्मचारी सतीश नायकवाड, श्रीकांत उप्पार, मारुती कोटबागी, बाळेश पडनाड, आनंद कोटगी, शिवानंद वर्चगल्ल आणि तांत्रिक विभागातील रमेश अक्की, महादेव काशिद व दीपक दोड्डगोणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या पथकाच्या कामगिरीचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी कौतुक केले आहे.

— बेळगाव लाईव्ह

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.