बेळगाव लाईव्ह : बेळगाव जवळील सोनोली गावात भरदिवसा एका वृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून ८ तोळे सोने, २० तोळे चांदी आणि ५० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धाडसी चोरी झाली आहे.
घरातील सर्व सदस्य शेतात काम करण्यासाठी गेले असताना दोन चोरट्यांनी घरात घुसून हा प्रकार केला. या घटनेमुळे सोनोली गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोनोली गावातील मुख्य रस्त्यावरील एका घरात सोमवार दिनांक २० जुलै रोजी सकाळी बाराच्या सुमारास घरातील इतर मंडळी शेतामध्ये भात रोप लावणीच्या कामासाठी गेली होती. या वेळी घरात केवळ एक वृद्ध महिला एकटीच होती. हीच संधी साधून दोन चोरट्यांनी घराच्या पाठीमागच्या बाजूने आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर थेट वृद्ध महिलेच्या गळ्याला चाकू लावला. जीवे मारण्याची धमकी देत त्यांनी कपाटाची दारे उघडायला लावली. कपाटात ठेवलेले ८ तोळे सोन्याचे दागिने, २० तोळे चांदी आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन चोरटे फरार झाले.

या घटनेची माहिती मिळताच वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार चोरीच्या ऐवजाचा हा तपशील समोर आला असून अधिकृत पोलीस तपासानंतर सत्य समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.





