belgaum

SIR मुदतीत पूर्ण करा; राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे निर्देश

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: नवीन मतदारांची नोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच मतदारांच्या तपशीलातील दुरुस्ती यांसह मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेचे १०० टक्के काम पूर्ण करण्यासाठी बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांनी घराघरात जाऊन माहितीची पडताळणी करावी, असे निर्देश कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अनबुकुमार यांनी दिले.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी मतदार यादीच्या विशेष सघन पुनरिक्षण (SIR) संदर्भात झालेल्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचे विशेष पुनरिक्षण सुरू असून, मतदार यादीची अचूकता आणि शुद्धता राखण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांनी पुनरिक्षणाचे काम अधिक वेगाने पूर्ण करावे, असेही त्यांनी निर्देश दिले.

 belgaum

मतदार यादी पुनरिक्षणाशी संबंधित सर्व माहिती मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना वेळेत उपलब्ध करून द्यावी. प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता राखण्यासाठी प्रत्येक टप्प्याची माहिती अधिकृतपणे राजकीय पक्षांसोबत सामायिक करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय पक्षांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी, हरकती आणि अर्ज यांची योग्य नोंद ठेवून त्यांचे अभिलेख व्यवस्थित जतन करावेत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार अशा तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असेही त्यांनी सांगितले.

मतदार यादी पुनरिक्षणाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या सूचना व हरकतींची नोंद करावी आणि आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

सध्या मतदार पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून, प्रत्येक मतदाराची माहिती बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. एखाद्या घरात मतदार दीर्घकाळ वास्तव्यास नसल्यास त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्याकडून माहिती घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

१०० टक्के पुनरिक्षणाचे उद्दिष्ट

प्रत्येक तालुक्यात मतदार पुनरिक्षणाचे काम किमान ५० टक्क्यांपेक्षा कमी राहू नये आणि अंतिम उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करावे, असे निर्देश देण्यात आले.

बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर अडचणी आल्यास त्यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे.

मतदार पुनरिक्षणाची संपूर्ण जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर असून, माहिती संकलनाची प्रगती वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करावी. जिल्ह्यातील सर्व बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांशी संवाद साधून येणाऱ्या अडचणींचा आढावा घ्यावा. ८ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत असून, ज्या भागात अद्याप पुनरिक्षण सुरू झालेले नाही तेथेही हे काम पूर्ण करावे, असे अनबुकुमार यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना आणि निर्देशांचे काटेकोर पालन करून कोणतीही त्रुटी किंवा निष्काळजीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

या बैठकीस परिविक्षाधीन आयएएस अधिकारी रोहित सिंग, अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, तसेच एआरओ, एईआरओ, रिटर्निंग अधिकारी, सहाय्यक रिटर्निंग अधिकारी आणि निवडणूक विभागातील अधिकारी उपस्थित होते.

बूथ स्तरावर पाहणी

बैठकीनंतर कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. अनबुकुमार आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मोहम्मद रोशन यांनी वडगाव परिसरातील खासबाग क्रमांक ३ शासकीय शाळेला भेट देऊन मतदार यादी विशेष सघन पुनरिक्षणाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.