Monday, December 23, 2024

/

शहरात पुन्हा वाहतूक कोंडीची डोकेदुखी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराचा विकास जसजसा होत आहे तसा दुसऱ्याबाजूला समस्यांचा पाढाही वाढत चालला आहे. कोरोना कालावधीनंतर आता हळूहळू सर्व व्यवसाय आणि व्यवहार पूर्ववत होत चालले असून गेल्या दोन ते अडीज वर्षांपासून बंद असलेली आस्थापने, व्यवसाय, उद्योग देखील पूर्वपदावर येत आहेत. या अनुषंगाने नागरिकांची देखील वर्दळ रस्त्यावर वाढली असून पर्यायाने वाहनांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. परिणामी, बेळगावमधील वाहतुकीची समस्याही पुन्हा डोके वर काढत आहे.

गेल्या ८ ते १० वर्षात बेळगावमधील वाहतूक कोंडीची समस्या तसेच पार्किंगची समस्या दूर सारण्यासाठी ठिकठिकाणी मास्टर प्लॅन राबविण्यात आला. उड्डाणपुलांचे बांधकाम करण्यात आले. मात्र, यानंतरदेखील बेळगावच्या वाहतूक समस्येचा प्रश्न काही सुटला नाही. दिवसागणिक वाढत चाललेला शहराचा पसारा आणि यानुसार वाढत चाललेली बेळगावची रहदारी यामुळे शहरात ठिकठिकाणी पुन्हा वाहतूक कोंडीने डोके वर काढले आहे.

शहराच्या विकासाकडे जितक्या सोयीनुसार लक्ष दिले जात आहे तितक्याच सोयीनुसार शहराच्या वाहतुकीच्या समस्येकडे मात्र पोलीस आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात अनेकठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यरत आहे. मात्र बेशिस्तपणाने, नियमबाह्य पार्क करण्यात आलेली वाहने, सिग्नल यंत्रणेच्या बाजूलाच दिवसभर पार्क करण्यात आलेली चारचाकी वाहने, निरुपयोगी बसथांब्याच्या शेडमध्ये उभारण्यात आलेली मोठमोठी वाहने, रस्त्यावरील विक्रेत्यांनी थाटलेली दुकाने, पदपथावर विक्रेत्यांचे आणि फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि एकंदर वाढलेली वाहनांची संख्या यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरु होत आहे. उन्हाच्या झळा तीव्र होत चालल्या आहेत, एकीकडे अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे आणि अशातच रहदारी पोलिसांकडून होत असलेली वाहनचालकांची अडवणूक, हेल्मेट सक्ती आणि वाहतूक कोंडीत कर्णकर्कश्श आवाजात वाहनचालकांकडून वाजविले जाणारे हॉर्न! या साऱ्या गोष्टींवरून शहरातील वाहतुकीच्या समस्येचा अंदाज येतो. विविध ठिकाणी होणारी वाहतुकीची समस्या पाहता याकडे रहदारी विभाग आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येत आहे. दरवर्षी मार्च महिना जवळ आला कि रहदारी पोलिसांकडून ठिकठिकाणी वाहनचालकांची अडवणूक करून या ना त्या कारणाने दंड आकारला जातो. कागदपत्रांची तपासणी केली जाते. अनेकवेळा वाहनचालकांकडून नाहक दंड आकारणारे पोलिसही आपण पाहिले आहेत. मात्र वाहनचालकांकडून रहदारीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंड आकारण्यात जितकी सजगता दाखविली जाते, तितकी सजगता वाहतूक आणि रहदारीच्या समस्या सोडविण्यासाठी का दाखविली जात नाही? असाही प्रश्न उपस्थित होतो.

शहरात चारीबाजूंनी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांचा उद्देश शहरातील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्याचा होता. मात्र वाहतुकीच्या समस्या मार्गी लागण्या ऐवजी याच भागात सर्वाधिक वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. इतकेच नव्हे तर उड्डाणपुलांवरदेखील हाऊसफुल्ल गर्दी झाल्याने लाखो रुपयांच्या पैशांचा चुराडा झाल्याचा आरोपही जनता करत आहे. अनेक ठिकाणी रहदारी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतुकीचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतो. शहराच्या मध्यवर्ती भागातील सिग्नल यंत्रणा वगळता आसपास परिसरातील सिग्नल यंत्रणा कित्येकवेळा कुचकामीच ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहराच्या चोहोबाजूंनी रस्ते विस्तारले असले तरीही वाहनचालकांना मात्र लांबलचक वाहनांच्या रांगेतून कसरत करूनच मार्ग काढावा लागत आहे. स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये विकास साधण्यात आला. शहराचे आता स्मार्ट शहर होत आहे. मात्र, दिवसभर धावणाऱ्या शहरातील बेळगावकर वाहतुकीच्या समस्येतून कधी मुक्त होणार? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.