नवनिर्मित शिमोगा विमानतळ आणि नूतनीकरण करण्यात आलेल्या बेळगाव रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनासाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी बेळगाव रेल्वे स्थानकाची प्रलंबित अर्धवट विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नैऋत्य रेल्वे जोमाने कार्यरत झाले आहेत. पंतप्रधान यांच्या दौऱ्याचा निश्चित कार्यक्रम आणि तपशील अद्याप जाहीर झाला नसला तरी उद्घाटनाच्या सोहळ्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.
शिमोगा आणि बेळगाव येथील उद्घाटनांच्या सोहळ्या व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी या दोन्ही शहरातील अन्य विकास कामांचेही उद्घाटन करण्याची शक्यता आहे.
आगामी येत्या महिन्याभरात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष केंद्रातील पक्ष नेत्यांना निमंत्रित करू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आपल्याला मते मिळतील असेही त्यांनी जाहीर केले आहे.