बेळगाव लाईव्ह : येळ्ळूर येथील राजहंसगड किल्ल्यावर सुरु असलेल्या विकासकामावरून तसेच शिवस्मारकाच्या उदघाटनावरून राजकारण तापले असून सदर विकासकामांचे आणि शिवस्मारकाच्या उद्घाटन ५ मार्च रोजी करण्याची घोषणा झाली आहे.
दरम्यान, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी श्रेयवादावरून राजहंसगड विकासकामांच्या उदघाटनाबाबत ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे. या श्रेयवादाच्या राजकारणात शनिवारी मोठा ट्विस्ट येणार असून राजहंसगड किल्ल्यावर सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी आमदार रमेश जारकीहोळी, माजी आमदार संजय पाटील, राज्य ओबीसी मोर्चा सचिव किरण जाधव यांच्यासह भाजपचे ग्रामीण नेते आणि पदाधिकारी किल्ल्याला भेट देणार आहेत.
राजहंसगडावर सुरु असलेली विकासकामे आणि ५ मार्च रोजी होणार उदघाटन सोहळा याचे सर्व श्रेय ग्रामीण मतदार संघाच्या आमदार आणि काँग्रेस लाटत असल्याचा आरोप जारकीहोळी यांनी नुकताच एका मेळाव्यात केला होता. शिवाय राजहंसगडावर सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी आपण उद्घाटनापूर्वी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होती.
राजहंसगडाचा विकास हा राज्य सरकारच्या अनुदानातून होत असल्याने ५ मार्च रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी सहभागी होणे गरजेचे असल्याचेही जारकीहोळी म्हणाले होती. किल्ल्याचा विकास, स्मारकाच्या कामावरून आधीच राजकारण तापले असून किल्ल्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीनेही माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शनिवारी रमेश जारकीहोळी आणि इतर भाजप नेते राजहंसगड किल्ल्याला भेट देऊन पाहणी करणार असून यादरम्यान ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. यामुळे राजहंसगड किल्ला विकासकाम आणि उद्घाटन समारोह यासाठी शनिवारचा दिवस मोठा ट्विस्ट आणणारा ठरणार आहे.