मोदी! मोदी! मोदी! भारत माता की जय अशा प्रचंड जयघोषणात आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेळगाववासियांनी आज मोठ्या जल्लोषी वातावरणात अभुतपूर्व स्वागत केले. बेळगावातील पंतप्रधानांचा ऐतिहासिक रोड शो शहरवासीयांच्या अपूर्व उत्साहासह प्रचंड प्रतिसादात पार पडला.
एपीएमसी येथील केएसआरपी मैदानावरील हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी आगमन झाल्यानंतर शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकापासून त्यांच्या रोड शोला सुरुवात झाली. चन्नम्मा सर्कल येथून कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, टिळक चौक, हुतात्मा हेमु कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिज, एसपीएम रोड, छ. शिवाजी उद्यान, जुना पी. बी. रोड मार्गे मालिनी सिटी येथील जाहीर सभेच्या ठिकाणापर्यंत सुमारे 10 कि. मी. अंतराचा हा रोड शो करण्यात आला.
रोड शो दरम्यान आपल्या वैयक्तिक सुरक्षा व्यवस्थेच्या गराड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या विशेष बुलेटप्रूफ कार गाडीच्या डाव्या दरवाज्यात उभे राहून रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या नागरिकांना हात हलवून सुहास्यवदनाने हात अभिवादन करत होते. रोड शोच्या मार्गावर ठिकठिकाणी पंतप्रधानांवर पुष्पवृष्टी केली जात होती. चन्नम्मा सर्कल पासून शनी मंदिरापर्यंत कार मध्ये उभ्या असलेल्या पंतप्रधानांनी कपिलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिजच्या ठिकाणी कारमध्ये काही क्षण बसून थोडी विश्रांती घेतली.त्यानंतर ते पुन्हा कारच्या दारात उभे राहून जनतेला अभिवादन करत होते. पंतप्रधानांच्या कार गाडी समवेत दुतर्फा धावणारे काळे कोट, सूट, टाय घातलेले डोळ्यावर काळा गॉगल असलेले सशस्त्र दणकट कमांडो साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
कपिलेश्वर रेल्वे ओव्हर ब्रिजपासून पुढील मार्गावर छ. शिवाजी उद्यानानजीक ढोल ताशांच्या दणदणाटात पुष्पवृष्टी करून पंतप्रधानांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. या ठिकाणी सुहासिनी महिला डोक्यावर मंगल कलश घेऊन मोदीजींचे स्वागत करताना दिसत होत्या. संपूर्ण रोडशो मार्गावर आपल्या लाडक्या पंतप्रधानांचे स्वागत करताना बेळगाववासियांमध्ये अपूर्व उत्साह दिसून येत होता. रोडशो मार्गावर सर्जिकल स्ट्राइक वगैरेंसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कटआउट लावण्यात आले होते. ठिकठिकाणी ढोल -ताशे पथकांच्या दणदणाटाव्दारे आनंद व्यक्त केला जात होता.
पंतप्रधान मोदी यांना पाहण्यासाठी रोडशो मार्गावरील दुतर्फा असणाऱ्या इमारतींवर नागरिकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळत होते. पंतप्रधानांवर इतक्या मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी होत होती की त्यांच्या सुरक्षारक्षकाला कार गाडीची दर्शनीय काच सातत्याने साफ करावी लागत होती. भारत माता की जय या घोषणेसह मोदी, मोदी, मोदीच्या जयघोषाने मालिनी सिटीकडे जाणारा मार्ग दुतर्फा उभ्या असलेल्या दणाणून सोडला होता.
कांही चाहते रस्त्याच्या दुसऱ्या अंगाने पंतप्रधानांच्या ताफ्या समवेत धावताना दिसत होते. बेळगाव शहरात मतदार संघातील रोड शोच्या मार्गावर भगवे फेटे परिधान केलेल्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संपूर्ण रोड शोच्या मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनामुळे जणू उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. पंतप्रधानांचे सुरक्षा पथक रोड शो च्या मार्गाचे संपूर्ण 10 कि. मी. अंतर पंतप्रधानांच्या कारसोबत चालत व धावत पूर्ण केले.
इतके करूनही त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही शीण दिसत नव्हता, ते सतर्क ताजेतवाने दिसत होते. यावरून त्यांच्या तंदुरुस्ती आणि कार्यक्षमतेची कल्पना येत होती. राज्याच्या पोलिस प्रशासनाने देखील पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन अतिशय उत्तमरीत्या केल्याचे जाणवत होते होते. शहरवासीयांचा अभुतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ऐतिहासिक रोड शोची अखेर मालिनी सिटी येथे यशस्वी सांगता झाली.