Friday, April 26, 2024

/

मोदींनी मराठी भाषिकांच्या भावनेवर पाणी फेरले!

 belgaum

बेळगाव लाईव्ह: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणाची स्वतःची अशी विशिष्ट शैली आहे. त्यांच्या विशेष शैलीमुळे आजवर अनेक ठिकाणी त्यांचे भाषण गाजत आले आहे. त्यांच्या भाषणातील एक खासियत म्हणजे ते ज्या ठिकाणी जातात, तेथील प्रांतीय भाषेत नेहमीच ते भाषणाला सुरुवात करतात.

मात्र आज बेळगाव दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांना बेळगावची बहुल लोकसंख्या मराठी असल्याचा विसर पडला. आणि कर्नाटक दौरा गृहीत धरून त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात कन्नडमधून केली. यामुळे समस्त मराठी भाषिक जनतेचा हिरमोड झाला.

आपल्या भाषणात प्रत्येक लहान सहान गोष्टीची जाणीव ठेवून तसा उल्लेख करणाऱ्या पंतप्रधानांना बेळगावमधील मराठी संस्कृतीचा विसर पडला की त्यांना तशी माहिती देण्यात आली होती, याबाबतदेखील शंका उपस्थित होते आहे.

 belgaum

आज मराठी राजभाषा दिन आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करावी, अशी मागणी महाराष्ट्रातील शिवसेना नेते राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून केली होती. मात्र पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात कन्नडमधून केली आणि यामुळे समस्त मराठी भाषिकांच्या भावनांवर पाणी फेरले गेले.

पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्याची उत्सुकता बेळगावमधील जनतेला मोठ्या प्रमाणात होती. आजच्या दिवशी पंतप्रधान कन्नडबरोबरच मराठीतूनही शुभेच्छा देत भाषणाची सुरुवात करतील, अशी अपेक्षा मराठी भाषिकांनी बाळगली होती. मात्र पंतप्रधानांनी कन्नडमधून भाषणाला सुरुवात केल्याने मराठी भाषिकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले.Modi speech

आपल्या भाषणात सातत्याने त्यांनी ‘बेळगाव’चा उल्लेख ‘बेळगावी’ असा केला. शिवाय क्रांतिवीर संगोळी रायन्ना आणि कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या नावाव्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा साधा उल्लेखही त्यांनी केला नाही. आपल्या भाषणात वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आवर्जून उल्लेख करणाऱ्या पंतप्रधानांनी आजच्या भाषणात शिवरायांचा उल्लेख टाळला. येथील मराठी भाषिक जनतेबद्दलही त्यांनी कोणताच उल्लेख केला नाही. पंतप्रधानांच्या कन्नड प्रेमामुळे मराठी भाषिक जनतेचा हिरमोड तर झालाच पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मराठी मतदारांसंदर्भात स्थानिक भाजप नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आलेल्या पंतप्रधानांच्या दौऱ्यात पंतप्रधानांनी मराठीकडे दुर्लक्ष केले, यामुळे मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप नेत्यांना नवनवीन कल्पना लढवाव्या लागणार आहेत आणि मराठी मते मिळविण्यासाठी पुन्हा तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.