बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. इतकेच नव्हे तर बेळगावमध्ये पंतप्रधानांचा रोड शोदेखील आयोजित करण्यात आला आहे. मात्र, राजकीय वर्तुळात मोदींच्या ‘रोड शो’बद्दल अनेक चर्चा-उपचारचांना ऊत आल्याचेही पाहायला मिळत आहे.
उत्तर कर्नाटकात सध्या भाजप नेत्यांमध्ये मतभेदाचे राजकारण सुरु आहे. वरिष्ठ नेत्यांमध्ये असलेले मतभेद आणि अंतर्गत वाद यामुळे भाजप सध्या उत्तर कर्नाटकात पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही दौरा बेळगावला झाला असून यादरम्यानही भाजप नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला होता.
मात्र, हा प्रयत्नही विफल ठरला असून आता पंतप्रधानांशिवाय भाजपाकडे कोणतेही भांडवल शिल्लक राहिले नाही. देशात बहुमत असूनही अनेक ठिकाणच्या निवडणुकीदरम्यान थेट पंतप्रधानांनाच रस्त्यावर उतरावे लागते, यावरून भाजपाकडे नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरे भांडवल नसल्याचे सिद्ध होते.
पंतप्रधानांचा चेहरा म्हणजे भाजप असे समीकरण बनल्यामुळे त्यांचा दौरा, मतदारांसमोर त्यांच्या माध्यमातून करण्यात येणारी मतयाचना, त्यांची बोलण्याची शैली सध्या हेच भांडवल भाजप निवडणुकीच्या काळात वापरत आहे. सध्या भाजप नेत्यांमध्ये असलेली अंतर्गत दुफळी पाहता उत्तर कर्नाटकात भाजप थोडा बॅकफूटवर गेल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर कर्नाटकात भाजपचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी सुरु असलेला हा प्रयत्न भाजपाला नवी दिशा देईल का? हे पाहणे गरजेचे आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिला बेळगाव दौरा असून पक्षामध्ये निर्माण झालेले अंतर्गत गटातटाचे राजकारण मिटविणे, संघटना मजबूत करणे, कार्यकर्ते आणि नेत्यांना एकीचा संदेश देणे हा यामागील उद्देश असण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा सर्व्हे करण्यात आला असता ७० हुन अधिक जागांची बेरीज भाजपाला जमत नसल्याचेही वृत्त आहे. काही काळापूर्वी गुजरातमध्येही अशीच परिस्थिती अनुभवायला मिळाली होती. यावेळीही पंतप्रधानांचा दौरा गुजराथमध्ये आयोजित करण्यात आला होता. आणि गुजराथमधील परिस्थिती पालटली होती.
कर्नाटकात करण्यात आलेल्या सर्व्हेचा आकडा वाढविण्यासाठी केंद्रीय नेत्यांचा दौरा आखण्यात येत असून आधी अमित शहा आता नरेंद्र मोदी आणि यानंतर राजनाथसिंह यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. सध्या कर्नाटकात शिवमोगा आणि बेळगाव या भागात पंतप्रधानांचा दौरा आयोजिण्यात आला असून बॅकफूटवर गेलेल्या भाजपाला पुन्हा प्रवाहात आणणारा हा दौरा ठरेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.