रीजनल कनेक्टिव्हिटी स्कीम उडान-3 अंतर्गत घोडावत ग्रुपच्या स्टार एअरलाइन्स विमान सेवेचा उद्घाटन समारंभ आज सोमवारी दुपारी मोठ्या उत्साहात पार पडला.
बेळगावच्या सांबरा विमानतळावर आयोजित या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यसभा सदस्य खासदार प्रभाकर कोरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रिबीन कापून दीपप्रज्वलन करण्याद्वारे तसेच केक कापून स्टार एअरलाइन्सच्या विमान सेवेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य घोडावत ग्रुपचे संचालक निलेश बागी, मार्केटिंग हेड ऋतुराज, राजकुंवर, सेल्स हेड शशिकांत, विमानतळाचे अधिकारी पी. एस. देसाई, ईराप्पा वाली, राजकुमार पत्तार आदींसह स्टार एअरलाइन्ससह अन्य सर्व एअरलाइन्सचे स्टेशन मॅनेजर्स व स्टेक होल्डर्स उपस्थित होते. उद्घाटन समारंभानिमित्त व्हिजन फ्लाय एव्हिएशन बेळगावच्या विद्यार्थ्यांनी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
आपल्या उद्घाटनपर भाषणात प्रभाकर कोरे यांनी स्टार एअरलाइन्सला शुभेच्छा देऊन भविष्यात नवी दिल्ली वगैरे शहरांसाठी देखील विमानसेवा उपलब्ध करावी असे सांगितले. घोडावत ग्रुपचे संचालक निलेश बागी यांनी बेळगाव विमान तळावरून आपली विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिल्याबद्दल एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, नागरी उड्डाण मंत्रालय आणि उडान-आरसीएस स्कीम यांचे आभार मानले.
![Star air indor](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2020/01/ind-starair-324x160-1.jpg)
सांबरा विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी सर्वांना धन्यवाद देऊन बेळगावहून आठ शहरांना सुरू झालेल्या स्टार एअरलाइन्सच्या विमानाच्या दिवसाला सरासरी सव्वीस फेऱ्या आगमन उडान होतील असे सांगितले. स्टार एअरलाइन्सचे बेळगाव- इंदोर विमान (ओजी 121/122) आठवड्यातील सोमवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवशी कार्यरत राहिले. बेळगावच्या विमानतळावरून या कालावधीत सदर 50 आसनी विमानातून एकावेळी 40 प्रवासी इंदोरला जातील आणि इंदोरहून 41 प्रवाशांचे आगमन होईल, असेही मौर्य यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी बेळगावच्या विमानसेवेशी संलग्न सर्व 5 एअरलाइन्स कंपन्याचे दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. मेसर्स एअर इंडिया /अलायन्स एअर : 0831-2562522 किंवा 2562422, मेसर्स स्पाईस जेट : 0831-2562009, मेसर्स स्टार एअर : 0831-2562399, मेसर्स इंडिगो : 0831-25622345, मेसर्स ट्रू जेट : 0831-2562188.