अतिउत्साही तळीरामांमुळे शेतकऱ्यांना कसा मनस्ताप सहन करावा लागतो याची प्रचिती नुकत्याच झालेल्या थर्टीफर्स्टच्या दिवसानंतर आली, जेंव्हा शहर परिसरातील बऱ्याच शेतवाडींमध्ये खरकट्या पत्रावळी, प्लास्टिक ग्लास, प्लेटी आणि दारूच्या बाटल्यांचा खच् पाहावयास मिळाला.
मंगळवारी ३१ डिसेंबर झाला. अनेक शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली त्याची आत्ताच उगवण झालेली असताना त्याची तमा नसलेल्यांनी रात्री मिळेल त्या शेतात जाऊन मनसोक्त पार्ट्या केल्या. मांसाहारी जेवण,सिगारेट, वेगवेगळ्या मद्याच्या बाटल्या रिचवून रात्रभर धुडगूस घातला, पीकांची नासधूस केली. तथापी परतत असतानां जेवलेल्या पत्रवळ्या,प्लास्टिक व काचेच्या बाटल्या तसेच इतर साहित्य गोळा करुन त्याची योग्य विल्हेवाट लावायची सोडून संबंधित तळीराम सर्वकांही तिथेच सोडून गेले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेल्यावर शेतकऱ्यांच्या नजरेस हा सर्व प्रकार आला. तेव्हा संबंधित तळीरामांना लाखोल्या वाहत इकडेतिकडे पसरुन टाकलेल्या पत्रवळ्या, बाटल्या गोळा करुन त्या रस्त्यावर आणून ठेवतानां अनेक शेतकरी दिसत होते. थर्टीफर्स्टच्या पार्ट्या करणाऱ्यांनी शेतातील पीकांएवजी पडिक जागेत पार्ट्या केल्या असत्या तर काय बिघडले असते असा शेतकऱ्यांचा सवाल होता. आमच्या पीकांचे नुकसान थांबवण्याची सदबुध्दी आत्ताच्या पिढीला कधी येणार ? त्यांची उंची वाढली पण शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान करु नये हि बुध्दी मात्र वाढली नाही याचच नवल वाटतय, असेही अनेक शेतकरी सखेद म्हणताना दिसत होते.
थर्टीफर्स्टच्या रात्री नववर्षाच्या स्वागतासाठी अशा पद्धतीने रस्त्याशेजारी असलेल्या कोणाच्याही शेतात घुसून रंगीत पार्ट्या करण्याचे प्रकार फार पूर्वीपासून घडत आहेत. मात्र पार्ट्या करणाऱ्यांच्या हे ध्यानात येत नाही ही की आपल्या पार्ट्यांमुळे शेतकऱ्यांना किती मनस्ताप आणि नुकसान सहन करावे लागते. पार्ट्या करणाऱ्यांनी शेतात केलेला कचरा आणि नासधूस पाहून शेतकरी हतबल झाल्याचे चित्र दरवर्षी पहावयास मिळते.
तेंव्हा नववर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्या करणाऱ्यांनी त्या जरूर कराव्यात, परंतु त्यामुळे इतरांचे नुकसान अथवा त्यांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी, असे मत शेतकऱ्यांचा मनस्ताप पाहिलेल्या जाणकारांकडून व्यक्त होताना दिसत आहे.