कूपनलिकेच्या खुल्या धोकादायक खड्ड्यात लहान मुले पडल्याच्या घटना सर्वश्रुत असल्यातरी आता प्राण्यांसाठी देखील हे खड्डे मृत्यूचा जबडा ठरू लागले आहेत. अशीच एक घटना आज सोमवारी वडगाव येथे घडली असून याठिकाणी कूपनलिकेच्या तब्बल 40 फूट खोल खड्ड्यात पडलेल्या कुत्र्याला अग्निशामक दलाच्या जवानांनी जीवदान दिले.
याबाबतची माहिती अशी की नाझर कॅम्प, वडगाव येथील काटवा बिल्डिंगसमोर खोदण्यात आलेल्या कूपनलिकेच्या खड्ड्यात कुत्रे पडले असल्याचे तेथील रहिवाशांच्या सोमवारी निदर्शनास आले. मात्र कुपनलिकेच्या अरुंद आणि खोल खड्ड्यातून त्या असहाय्य कुत्र्याला बाहेर काढणे शक्य नसल्याने नागरिकांनी बेळगावच्या ऍनिमल वेल्फेअर असोसिएशनशी संपर्क साधला.
तेंव्हा ऍनिमल वेल्फेअर असोसिएशनचे अमित चिवटे, अरुण कारखानीस, प्रमोद कदम आदी मंडळी दोऱ्या वगैरे घेऊन काटवा बिल्डिंगसमोर पोहोचले. तथापि अरुंद खड्ड्यामध्ये सुमारे 40 फूट खोल जमिनीच्या आत पडलेल्या कुत्र्याला वाचविणे मुश्किल बनले होते. परिणामी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य हाती घेतले आणि सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर त्या कुत्र्याला सुखरूप बाहेर काढले. ऍनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांनी संबंधित धोकादायक कूपनलिका तात्पुरती बंद केली आहे.
तसेच वडगांव पोलिस स्थानकात या कूपनलिकेच्या मालकाशी या घटनेसंदर्भात संपर्क साधण्याविषयी माहिती देण्यात आली आहे. प्रिन्स कूपनलिकेच्या खड्ड्यात पडला आणि त्याची बातमी झाली. आता अशा खोदलेल्या खड्ड्यांमध्ये प्राणीही पडू लागली असून प्रशासन अद्याप ढिम्म असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.