बेळगावमधील हवेतील प्रदूषणाच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून ग्रीनपीस इंडियाने बेळगावसह कर्नाटकातील एकूण नऊ शहरांची धोकादायक प्रदूषित हवा असणाऱ्या शहरांच्या यादीत नोंद केली आहे.
बेळगावमधील हवेचे प्रदूषण वाढले असून ग्रीनपीस इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार बेळगावातील प्रदूषणाचा दर 89 मायक्रोग्रॅम पीएम 10 लेव्हल इतका झाला आहे. नॅशनल ॲम्बीयन्ट एअर क्वालिटी स्टॅंडर्डनुसार पार्टिक्युलेट मॅटर अर्थात पीएम 10 डेटा 60 मायक्रोग्रॅम इतका असावा लागतो.
याच्या तुलनेत बेळगावातील हवेच्या प्रदूषणात यावर्षी 86 मायक्रोग्रॅम इतकी मोठी वाढ झाल्याचे ग्रीनपीस इंडियाने आपल्या एअरपोकॅलिस रिपोर्ट अर्थात हवा प्रदूषणाच्या अहवालात नमूद केले आहे.
देशातील विविध शहरांमधील हवेच्या प्रदूषणाचा आपला अहवाल सादर करण्यापूर्वी ग्रीनपीस इंडियाने देशभरातील 745 केंद्रांकडून हवेतील प्रदूषणाची आकडेवारी जमा केली होती. त्यानंतर सखोल परिक्षण आणि अभ्यासांती बेळगावसह बेंगलोर, रायचूर, तुमकुर, कोलार, विजयपुरा, हुबळी, धारवाड आणि बागलकोट या शहरांमधील हवा जीवघेण्या धूलिकणांनी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असल्याचे जाहीर केले आहे. या शहरांमधील पीएम 10 लेव्हल हा सर्वसाधारण 60 मायक्रोग्रॅम पेक्षा अतिउच्च नोंदविला गेला आहे.